अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
पिंपरी प्रतिनिधी सनी घावरी
पुणे – देशात हिंदू – मुस्लीम – बौद्ध – ख्रिश्चन अश्या सर्वच धर्मियांना एकमेकांपुढे शत्रू म्हणून उभे केले आहे. एकमेकांच्या धर्माचा आदर करून परस्पर संमतीने विवाह करणारे तरुण जातीय – धर्मीय भेद नष्ट करत आहेत. देशासमोर अनेक संकटे उभी असताना धर्माच्या नावावर डोकी फोडण्यासाठी तरुणाईला चिथावणी देणाऱ्या कंटकांना “आंतरधर्मीय विवाह” करणारे तरुण योग्य उत्तर देत आहेत. त्यांचा रुग्ण हक्क परिषद, महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या वतीने सन्मान करून पाच हजार रुपयांचे बक्षीस देणार असे रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले.
राज्यात आणि देशात वाढत्या जातीय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. जाणीवपूर्वक धार्मिक हत्या घडविल्या जात आहेत. यासाठी रूग्ण हक्क परिषदेतर्फे आंतरजातीय – आंतरधर्मीय विवाह सन्मान उपक्रमाची माहिती पत्रकारांना देताना उमेश चव्हाण बोलत होते. यावेळी परिषदेचे केंद्रीय कार्यालयीन सचिव दीपक पवार, पुणे शहराध्यक्ष मनीषा तिखे उपस्थित होत्या.
उमेश चव्हाण पुढे म्हणाले की, करोनाच्या काळात सद्यपरीस्थितीत अनेक व्यक्ती बकरी ईद निमित्त, नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘प्लाझ्मा दान’ करण्याचे आवाहन करीत आहेत. रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदान करण्याचे आवाहन करीत आहेत. यावेळी ‘दान’ करणारे “हिंदू रुग्ण – मुस्लिम रुग्ण” अशी विभागणी करीत नाहीत. तर मदतीच्या माणुसकीच्या भावनेतून एकमेकांना मदत करण्याचे दिलासादायक चित्र सध्या दिसत आहे. मात्र आजही विवाह करताना धर्मभेद आडवा येत असल्याचे विदारक सत्य आहे. ऑनर किलिंगच्या घटनांनी जातीय आणि धार्मिक तेढ वाढतेय. स्वार्थी राजकारणी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख अश्या विभागण्या करून सर्व धर्मीय सलोखा धोक्यात आणत आहेत. आंतरधर्मीय विवाह करणारे तरुणच समाजातील धार्मिक तेढ ‘नष्ट’ करणारे स्रोत ठरत आहेत. रुग्ण हक्क परिषद त्यांचा यथोचित गौरव करून त्यांना पाच हजार रुपयांचे बक्षीस देणार आहे.
एकविसाव्या शतकात धर्म नव्हे तर कर्तृत्व बघितले पाहिजे. सर्वधर्मीय सलोखा जपला पाहिजे. दोन धर्मात जाणीवपूर्वक निर्माण केलेले शत्रुत्व कमी केले पाहिजे. माणसा – माणसात उच्च निचतेचा भेद मानणारी जात व्यवस्था नष्ट केली पाहिजे. यासाठी रक्तदान, अवयवदान आणि आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह घडवून आणले पाहिजेत. असेही ते म्हणाले!