आटपाडी तालुका साहित्य मंचाच्या वतीने आटपाडी तालुक्यातील साहित्यिकांचा मेळावा आणि कवी संमेलन उत्साहात संपन्न.

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
झरे(वृत्तसेवा)-‘माझा मराठीचा बोलू कौतुके | परि अमृतातेही पैजासी जिंके| ऐसी अक्षरे रसिके |मेळवीन||’ असे म्हणत रविवार दि. 23 एप्रिल 2023 रोजी झरे पंचक्रोशी जनता विद्यालय, झरे. येथे ‘आटपाडी तालुका साहित्य मंचाच्या वतीने आटपाडी तालुक्यातील साहित्यिकांचा मेळावा आणि कवी संमेलनाचा’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे सचिव भीमाशंकर स्वामी सर व ज्येष्ठ कवी रघुराज मेटकरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
मेळाव्याचे स्वागताध्यक्ष व संयोजक प्रा. साहेबराव चवरे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी झरे गाव व झरे पंचक्रोशीतील धार्मिक, सांस्कृतिक अशा विविध अंगाने नटलेल्या परंपरांचा वैशिष्टय़पूर्ण बाबींचा मागोवा घेताना गावाला कोणताही साहित्यिक वारसा नाही पण त्यातच माझ्यासारख्यांना वाचनाने प्रेरणा मिळून लिहिते व्हावे लागले.
महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कवी सुनील दबडे यांचा क्रांतीसिंह नाना पाटील यांचे नातू ॲड. सुभाष पाटील यांच्या हस्ते तर लेखिका सौ. पुष्पा मिसाळ मॅडम यांना ‘आण्णा भाऊ साठे कला रत्न पुरस्कार’ मिळाल्याबद्दल संमेलनाध्यक्ष कथाकथनकार विश्वनाथ गायकवाड यांच्या हस्ते तसेच काष्टशिल्पकार रमेश जावीर यांचा कवी रघुराज मेटकरी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू ॲड. सुभाष पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, गंगा ओढ्याच्या रुपात उगम पावते, मात्र समुद्राला मिळताना व्यापक रुप धारण करते. त्याप्रमाणे भविष्यात हे साहित्य संमेलन मोठे रुप धारण करेल. जात्यावरच्या ओव्या, धनगरी ओव्या हा सुद्धा साहित्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले.
‘वाजापकार’ रमेश जावीर म्हणाले की, झरे येथे साहित्य संमेलन होत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. ‘साहित्य’ जनसामान्यांचे प्रश्न मांडत असते.
गझलकार सुधाकर इनामदार यांनी ‘जे न देखे रवी | ते देखे कवी||’ असे म्हणत भाषणाची सुरुवात केली. दिव्याची वात उजळावी असे काहीतरी असते आणि ते म्हणजे साहित्य असते. अशा मोजक्या शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.
प्रा. बालाजी वाघमोडे यांनी आटपाडी तालुका साहित्य मंचाच्या वतीने प्रा. साहेबराव चवरे सरांचे कौतुक केले. साहित्यात चित्रपटाचे महत्त्व सांगितले. जागतिकीकरणाकडे कवी व लेखकाने लक्ष द्यावे. जगातील लेखकांची रचना माणदेशी कवी व लेखकांना ज्ञात होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. याशिवाय माणदेशी साहित्याची स्वतंत्र समिक्षा व्हावी हा मौलिक विचारही त्यांनी मांडला.
ज्येष्ठ कवी रघूराज मेटकरी बोलताना म्हणाले की, जे करायचे असेल ते मनापासून करा व ठामपणे करा. गेली 41 वर्ष अविरतपणे विटा येथे साहित्य सेवा मंडळाच्या माध्यमातून मराठी साहित्य संमेलने सुरू आहेत. या संमेलनामध्ये कथाकथनकार म्हणून प्रा. साहेबराव चवरे सरांच्या गाजलेल्या अनेक कथा ऐकण्याचे भाग्य आम्हा विटेकरांना लाभले आहे.
अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना विश्वनाथ गायकवाड म्हणाले की, मोजक्या शब्दात मोठा आशय सांगणे म्हणजेच मोठे भाषण किंवा काव्य असते. भाषण किती यापेक्षा कसे हे महत्त्वाचे आहे. गदिमांच्या गीत रामायणाने माणदेश जगात पोहोचला. पाण्याच्या भागात ऊस पिकत असला तरी माणदेशाने साहित्यात रस निर्माण केला. कविता एक मुक चित्र असते.
पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन संतोष वाघमारे यांनी केले.
त्यानंतर भोजनाचा आस्वाद घेऊन दुसऱ्या ‘कवी संमेलन’ या सत्राची सुरुवात प्रा. साहेबराव चवरे सर यांच्या प्रास्ताविकाने झाली. दुसऱ्या भागाच्या अध्यक्ष पदी सांगोल्याच्या लेखिका पुष्पा मिसाळ होत्या. तर सूत्रसंचालन गझलगार सुधाकर इनामदार यांनी केले.
यामध्ये हरिभाऊ गळवे यांनी ‘खंडोजी’ चा पोवाडा सादर केला. सिताराम अनुसे यांनी ‘ओ साहेब आम्ही झऱ्याचे’ ही कविता सादर केली. याचबरोबर बाबासाहेब कोकरे, चंद्रकांत हुलगे, दिलीप वाघमारे, अरुणा चव्हाण, सोमनाथ गाडे, मेघाताई पाटील, रमेश जावीर, विजय पवार, प्राध्यापक बालाजी वाघमोडे, जमादार सर, प्रवीण पारसे, सुनील दबडे, रघुराज मेटकरी, विश्वनाथ गायकवाड, ॲड. सुभाष पाटील, अरुण कांबळे बनपुरीकर, सुधाकर इनामदार या सर्व कवींनी आपल्या रचना सादर केल्या. दुसऱ्या सत्राचे आभार प्राध्यापक साहेबराव चवरे सर यांनी मानले.
यावेळी कार्यक्रमास प्रा. शिकलगार सर, गळवे सर, समीर मुलाणी, बरकडे मॅडम, अंकुश बरकडे, अश्विनी गायकवाड, हिरामण खोटरे, अरुणा चव्हाण, सागर पाटील, सत्यजित चवरे, जीवन पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदर संमेलनाच्या संयोजनामध्ये व कार्यक्रम नेटका करण्यामध्ये झरे पंचक्रोशी जनता विद्यालय, झरे चे मुख्याध्यापक देवानंद घोणते व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.