अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरातील नारायणवाडी परिसरात दुपारच्या वेळेस घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना दिनांक 04 नोव्हेंबर 2025 रोजी घडली आहे. या प्रकरणी मंगलाबाई दत्तात्रय नागणे (वय 58) यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.फिर्यादीनुसार, फिर्यादी या आपल्या पती दत्तात्रय नागणे यांच्यासह नारायणवाडी येथे राहतात. नागणे दाम्पत्य जय लक्ष्मी माता पूजा साहित्य दुकान चालवत उदरनिर्वाह करतात. 4 नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे 11.30 वाजता मंगलाबाई यांनी घराला कुलूप लावून गॅस सिलेंडरचे KYC करण्याकरिता राजेश्वरी गॅस एजन्सीकडे गेल्या होत्या. KYC करून त्या अंदाजे 12.40 वाजता घरी परतल्या असता घराचे दार उघडे, कडी-कोयंडा तुटलेला व कुलूप खाली पडलेले दिसले.घरात पाहणी केली असता लाकडी कपाटातील लॉकर फोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. तत्काळ त्यांनी पतीला संपर्क करून माहिती दिली. दोघांनी मिळून घरात शोध घेतला, मात्र दागिने आढळून न आल्याने चोरीचा निष्कर्ष स्पष्ट झाला.चोरी गेलेल्या दागिन्यांची किंमत अंदाजे ₹4,00,000 इतकी असून त्यामध्ये —सोन्याचे मंगळसूत्र (50 ग्रॅम) किंमत ₹2,50,000 सोन्याची अंगठी (6 ग्रॅम) किंमत ₹30,000सोन्याची बोरमाळ (10 ग्रॅम) किंमत ₹60,000सोन्याचे टॉप्स (4 ग्रॅम) किंमत ₹20,000चांदीचे पैंजण (250 ग्रॅम) किंमत ₹40,000 या दागिन्यांचा समावेश आहे.
याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.शहरात दुपारीच घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पोलीसांनी नागरिकांना घर सुरक्षित ठेवण्याचे तसेच संशयित हालचाली दिसल्यास तात्काळ पोलीसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
