मुंबई: देशात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार व बलात्काराच्या घटना वाढत आहे, हे प्रकार थांबले पाहिजे म्हणून महिलांवरील अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात सुनावणी प्रक्रिया जलद व्हावी या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून राळेगणसिद्धीत मौनव्रत धारण करणार आहेत. या आंदोलनासंदर्भात हजारे यांनी १० डिसेंबरला पंतप्रधानांना तर १३ डिसेंबरला राष्ट्रपतींना पत्र पाठविले आहे.अण्णा हजारे यांनी यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. हैदराबादमध्ये तरुणीला अत्याचार करून जिवंत जाळणाऱ्या चार आरोपींचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी आनंद व्यक्त केला. याचाच अर्थ न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होत आहे. न्याय मिळण्यात होत असलेल्या विलंबाविरोधात जनतेमध्ये आक्रोश आहे.त्यामुळे पोलिसांचा तपास, न्यायालयात सुनावणी प्रक्रिया जलद झाली पाहिजे. ज्युडीशिअल अकांटेब्लिटी बिल तत्काळ मंजूर झाले पाहिजे. पोलीस ठाण्यात महिला अत्याचारांसंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची सुनावणी होऊन आरोपींना शिक्षा मिळेपर्यंतची प्रक्रिया जलद होणे आवश्यक आहे. त्यामुळे राळेगणसिद्धीत आजपासून मौनव्रत आंदोलन सुरू करत असल्याचे हजारे यांनी पत्रकात म्हटले आहे.
Read Time2 Minute, 3 Second