अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड (प्रतिनिधी)-दौंड पोलीस स्टेशन हद्दीत बेटवाडी फाटा पाटस रोड ता.दौंड जि.पुणे येथे सुमारे दोन वर्षापूर्वी दरोडा टाकून लूटमार केलेल्या टोळीतील फरारी असलेल्या अट्टल दरोडोखोरास स्थानिक गुन्हे शाखेचे टिमने जेरबंद केल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली .
दिनांक ४ एप्रिल २०१८ रोजी बेटवाडी फाटा पाटस रोड ता.दौंड जि.पुणे येथे मुंबई येथील सोनेचांदीचा व्यापारी उद्देश मोहन चव्हाण वय ३३ रा.मालाड मुंबई यांना दिपक नावाचे इसमाने मोबाईलवर फोन करुन एक किलो सोने प्रति तोळा दहा हजार रुपये किंमतीने देतो असे अमिष दाखवून बोलावून घेवून फिर्यादी व त्याचा मित्र सोने आणणेसाठी आले असताना दिपक व त्याचे ६ साथीदारांनी त्यांना जबर मारहाण करुन चाकूचा धाक दाखवून त्यांचेकडील रोख रक्कम एक लाख रुपये, सोन्याची अंगठी व इतर ऐवज असा १,१७,०००/- चा माल जबरदस्तीने हिसकावून पळून गेले होते. त्याबाबत त्यांनी दौंड पोलीस स्टेशनला तक्रार दिलेवरुन दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयात यापूर्वी ४ आरोपींना अटक करण्यात आलेली असून माऊली भोसले रा.बेटवाडी व त्याचा आणखीन एक साथीदार गुन्हा घडलेपासून फरार होते. पोलीसांच्या भितीने ते गावी न राहता श्रीगोंदा अहमदनगर येथे नाव बदलून राहत होते.
पुणे ग्रामीण जिल्हयातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणेसाठी नव्याने पदभार घेतलेले पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केलेली आहे.
त्यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे जिल्हयातील गुन्हेगारीला आळा घालणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी मार्गदर्शनाखाली विभागानुसार गुन्हे शाखेच्या पथकांची नेमणूक केलेली आहे.
दिनांक २० नोव्हेंबर २०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली
सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, गुरू गायकवाड, सुभाष राऊत यांचे पथक दौंड परिसरात रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी आरोपींचा शोध घेत असताना दरोडयाच्या गुन्हयातील सुमारे दोन वर्षापासून फरारी असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार माऊली बंटया भोसले वय २१ वर्षे रा.बेटवाडी ता.दौंड जि.पुणे हा दौंड नगर मोरी चौक येथे येणार असल्याची बातमी एका खबऱ्याकडून गुन्हे शाखेचे पथकास मिळाली होती. त्याप्रमाणे त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी जावून सापळा रचून आरोपी माऊली भोसले यास ताब्यात घेणेसाठी गेले असता तो पळून जात असताना त्यास पाठलाग करून पकडले आहे. आरोपी माऊली भोसले हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी श्रीगोंदा पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर येथे दरोडा प्रयत्न केलेबाबत गुन्हा दाखल आहे.
सदर आरोपीने फरार कालावधीत आणखीन गुन्हे केल्याची शक्यता असून त्याबाबतचा पुढील अधिक तपास दौड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत.