बार्टीतील वादग्रस्त अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे-गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
शहर प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-बार्टीतील वादग्रस्त अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
याबाबत आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून विविध विकासाच्या योजना राबविण्यात येत आहेत. यातून समाजाचा बऱ्यापैकी विकास होण्याची शक्यता असतानाच बार्टीला मूळासह संपविण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समतेचे विचार गावागावांत पोहोचविण्यासाठी चांगल्या अधिकाऱ्यांची गरज असते. मात्र, दोन महासंचालकांची नियुक्ती सोडली तर उर्वरित महासंचालकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून आले आहे. जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे दोन अधिकारी आले होते. त्यांना जातीयवादी मानसिकतेच्या अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी विविध आरोप करून ‘सळो की पळो ‘ करून सोडले. त्यातील एकाही महासंचालकांचा कार्यकाळ पूर्ण करू दिला नाही. बौद्ध महासंचालकांना पदावरून हटविण्यासाठी बार्टीतील अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागातील अधिकारी कंबर कसून असतात. त्यामुळेच बार्टीत त्यांना कार्यकाळ पूर्ण करता येत नाही. बौद्धेत्तर महासंचालकांना कोणतेही आरोप न करता त्यांचा कार्यकाळ पूर्ण होतो. त्यामुळे बार्टीत सत्ता प्रस्थापित करणारी टोळी येथे असल्याचे दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असलेल्या बार्टीला बदनाम करून तिला बंद करण्याचा घाट बार्टीमधील काही अधिकारी करीत आहेत.सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी दिनेश डिंगळे त्यांना मदत
करीत असल्याचे दिसून येते आहे. बार्टीमधील निबंधक इंदिरा अस्वार यांच्यामुळे बार्टीची मोठी बदनामी होत असल्याचे दिसून येते आहे. स्वतःला सुरक्षित करण्यासाठी समाजातील लोकां चे मोर्चे काढून व दवाबतंत्र वापरून कारवाई टाळण्याचे प्रकार केले जातात. त्यांच्याविरोधात कारवाई केल्यानंतर मॅटमध्ये जाऊन पद वाचविले जाते. मात्र या प्रकरणामुळे बार्टीची मोठी बदनामी झाली आहे. त्यांनी केलेल्या गैरकारभाराची विभागीय चौकशीचे प्रकरण सामाजिक न्याय विभागातून मुख्यमंत्र्यांकडे गेले आहे. त्यावर सही होताना दिसून येत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरुन येरवडा येथील कार्यशाळेत “डान्स हंगामा” करण्याचे षडयंत्र घडवून आणल्याचे दिसून येते. या अधिकाऱ्यांची पदमुक्ती करण्याची मागणी अनेक दिवसांपासून असूनही सचिव हे निबंधकांना घाबरत असल्याचे दिसून येते. या प्रकरणात मात्र, बार्टीची पत गेल्याची चर्चा आहे.समतादूत प्रकल्पातील नसरीन तांबोळी यांना कामचुकार असल्याचे सांगून माजी महासंचालकाने काढून टाकले होते. मात्र, नवीन महासंचालक वारे आल्यानंतर तिला पुन्हा रुजू करुन घेण्यात आले. निबंधक अस्वार यांनी महासंचालक वारे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही विशिष्ट समाजाच्या कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरू केला आहे. आंबेडकरी विचार घरोघरी पोहोचविण्याचे काम करणाऱ्यांना कामावरून काढून टाकणे, काम न देणे इत्यादी प्रकार येथे होत आहेत .आपणास विनंती अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे नाहक समाजामध्ये बार्टीची बदनामी होत आहे.आपणास विनंती करण्यात येते की ,आठ दिवसात सामाजिक न्याय विभागाचे दिनेश डांगळे, निबंधक इंदिरा अस्वार,समतादूत प्रकल्पातील नसरीन तांबोळी यांची प्रशासकीय चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा सोमवार दिनांक 12 मे 2023 रोजी सामाजिक न्याय विभागाच्या पुणे येथील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्व जबाबदारी शासनाची राहील अशी माहिती राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी दिली यावेळी राज्य महासचिव विठ्ठल सावंत उपस्थित होते .या निवेदनाच्या प्रती प्रकाश आंबेडकर साहेब , राष्ट्रीय अध्यक्ष ,वंचित बहुजन आघाडी , मुख्य सचिव ,सामान्य प्रशासन विभाग ,मंत्रालय मुंबई व प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांना मेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत .