मन सुसंस्कृत झाल्याशिवाय विकासाची दारे उघडत नाहीत हे सत्य उमगलेले, स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रचंड पगडा असलेले आणि तरुणाईचा ‘आयडॉल’ ठरलेले व्यक्तिमत्व म्हणजे खासदार उन्मेश भैयासाहेब पाटील.

0 0
Read Time10 Minute, 11 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

व्यक्ती विशेष

दरेगाव लोंढे (ता. चाळीसगाव) हे त्यांचे मूळ गाव. वडील भैयासाहेब बेलगंगा साखर कारखान्यात लेखापाल तर आई मंगला गृहिणी. दोन विवाहित बहिणी – असे हे पंचकोनी कुटुंब. चाळीसगावला शालेय शिक्षणानंतर त्यांनी १९९४ ला प्रवरानगरहून पॉलीटेक्निक तर १९९७ मध्ये जळगाववरुन बी.ई.(केमिकल) उत्तीर्ण केले. कॉलेज जीवनातही त्यांच्या बुध्दिमत्तेची चुणूक दिसून आली. तीनही वर्षी ‘ओपन हाऊस’ मध्ये ते अव्वल ठरले. १९९९ ला दिल्लीला मानव विकास मंत्रालयातर्फे झालेल्या ‘युवा संसद’ स्पर्धेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करतांना ते ‘बेस्ट स्पीकर ऑफ पार्लमेंट’ ठरले होते. कै. प्रमोद महाजन यांच्याहस्ते त्यांचा गौरवही झाला हेाता. मुंबईच्या बोस्टन कॉम्प्युटर इन्स्टिस्टूटमधून ‘ई-कॉमर्स’ ची पदवी घेऊन २००१ मध्ये त्यांनी मराठीतून हिशेब, मोजणी यांच्याशी संबंधित ‘ई-मुनिमजी’ हे सॉफ्टवेअरही तयार केले होते.

यासोबतच वनजीबाबा मंडळातर्फे अध्यापक विद्यालय, सौ. शांतीदेवी चव्हाण पॉलीटेक्निक आदींद्वारे त्यांनी तालुक्यात शिक्षणची गंगा आणली.

एम.एस्सी. (पर्यावरणशास्त्र) एम.एड.केलेल्या संपदा यांनी २००५ मध्ये उन्मेश यांच्या आयुष्यात पत्नीच्या रुपात प्रवेश केला. सृष्टी, स्वामी आणि समर्थ या अपत्यांनी त्यांच्या घराचे गोकुळ केलेय. शिक्षणावर नितांत प्रेम करणार्‍या उन्मेश यांचा शेती हा ‘श्वास’ आणि शेतकर्‍यांची समृध्दी ‘ध्यास’ होता. त्यातूनच त्यांनी पाच हजार एकरावर ‘करार शेती ’ चा यशस्वी प्रयोग करुन शेतकर्‍यांना विकासाचा मार्ग दाखविला. चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेला ‘बेलगंगा’ साखर कारखाना विक्री न करता भाडेतत्वावर सुरु व्हावा यासाठी त्यांनी पदयात्रा, जनजागृती अभियान आदी माध्यमातून तालुक्यात मोठे आंदोलन उभारले. शेतकरी आणि युवकांचा थेट जिल्हा बँकेवर मोर्चा काढून संचालकांसमोर शेतकर्‍यांच्या अडचणी मांडल्या होत्या. उन्मेश पाटील यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून तालुकाभर असंख्य उपक्रमांचा जणू धडाका लावला. शालेय साहित्यापासून तो व्यायामाच्या साहित्यापर्यंत आणि नेत्रतपासणीपासून तो शस्त्रक्रियांपर्यंत विविध शिबिरांद्वारे उन्मेश पाटील मित्र मंडळाने अडचणी सोडवल्या.

तालुक्यातील युवक चळवळीचे नेतृत्त्व करणारा हा उमदा तरुण भारतीय जनता पक्षाचा सक्रिय सदस्य, पदाधिकारी झाला. आणि त्यांच्यातील नेतृत्वगुण हेरत गुणवत्तेच्या बळावर पक्षाने त्यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत चाळीसगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली. आणि पक्षाच्या विश्वासाला पात्र ठरत २२ हजारांहून अधिक मताधिक्य मिळवत त्यांनी विजय संपादन केला. ही जनतेच्या प्रेमाची पावती आहे असे ते अत्यंत नम्रपणे सांगतात. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी तालुक्याला जागतिक दर्जाची गणित नगरी मंजूर करण्यासोबतच पर्यटन विकासाकडेही लक्ष दिले. १ हजार कोटींहून अधिकचे उद्योग चाळीसगाव MIDC मध्ये आणून व MIDC ला मुलभूत सुविधा पुरवत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण केला. शेतकर्‍यांसाठी जिल्ह्यात सर्वाधिक निधी आणि अनुदान आणले. आपल्या शिक्षणाचा व कौशल्याचा वापर करत शासकीय योजना तळागाळात पोहचवण्यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’ व ‘ समाधान शिबीर’ असे अभिनव उपक्रम राबविले. या उपक्रमांचे कौतुक मुख्यमंत्र्यांसह राज्यभरात केले गेले. आज चाळीसगाव तालुक्यात एकही रस्ता असा नसेल ज्यासाठी त्यांनी निधी आणून काम सुरु केले नसेल. शहरासाठी अंतर्गत ७१ कोटींची पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार (पहिला टप्पा) ६८ कोटी, नदी सुशोभीकरण, LED पथदिवे आदी कोट्यावधींची कामे मंजूर करून आणली.

विधानसभेत आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी जळगाव जिल्ह्यासह खानदेशातील सिंचन, पाणी, रस्ते आदी विषयांवर आवाज उचलला. निश्चित ध्येय ठेवून त्यासाठी रात्रंदिवस काम करण्याचा स्वभाव, समयसूचकता व अभ्यासू वृत्ती यामुळे त्यांना अल्पावधीत भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस पद मिळाले. तसेच राज्याच्या युवा धोरण समितीवर देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली. राज्याच्या ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या पंचायत राज समितीचे सदस्यपद व त्यांनतर प्रशासकीय लेखाजोखा पाहणाऱ्या राज्य विधिमंडळ अंदाज समितीचे सदस्यपद त्यांनी भूषविले. या समित्यांच्या दौऱ्यानिमित्ताने त्यांना राज्यभर प्रवास करता आला, जनतेच्या समस्या जाणून घेता आल्या. अनेक नव्या बाबी शिकता आल्याचे उन्मेश पाटील सांगतात.

२०१९ लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होण्यासाठी राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघ महत्वाचे होते. पक्ष कोणत्याही स्थितीत जोखीम घेण्यास तयार नसल्यामुळे एक उच्चशिक्षित, अभ्यासू व शासन – प्रशासनाचा अनुभव असणारा तरुण चेहरा म्हणून जळगाव लोकसभा मतदारसंघातून आमदार उन्मेश पाटील यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली. अवघे २० दिवस इतक्या कमी वेळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाने शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा कामाला लावत राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या ४ लाख ११ हजार मताधिक्याने त्यांनी विजय मिळविला. प्रचारादरम्यान त्यांनी राज्यात एक आदर्श खासदार म्हणून काम करेल असा शब्द त्यांनी जनतेला दिला होता. त्यांची आजवरची राजकीय कारकीर्द पाहता या जबाबदारीचे भान ठेवत तरसोद हायवे जळगाव शहरातून बाहेर पडणारे सर्व हायवे कामाला गती तसेच सात बलून बंधारे ते विमानतळ नाईट लँडिंग साठी सर्व परवानग्या मिळविल्या त्यांच प्रमाणे टेक्सटाइल पार्क ते कन्नड घाटातील बोगदा तसेच पाडळसरे धरणाचा समावेश पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेत करण्यासाठी संसदेत आवाज उठविला. अशा अनेक विषयांच्या पाठपुराव्यात नेहमीच प्रयत्नशील राहिले. संसदेच्या अधिवेशनात सात्यत्याने विवीध विषयावरील चर्चेत सहभागी झाले. याचा परिणाम असा झाला की देशातील टॉप पंचविस खासदारांमध्ये येण्याचा मान खासदार उन्मेश दादा पाटील यांना मिळाला. सतत जनतेशी संवाद आणि संपर्क ठेवून असल्यामुळे गेल्या वर्षात अधिकतर वेळ कोरोना रुग्णांच्या सेवा सुविधेसाठी व्यतीत होत असताना संपर्काची गल्ली ते दिल्ली नाळ अतूट ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे आणि यापुढेही सुरू राहील. त्यांचा प्रयत्न आहे की मुलगा आणि भाऊ म्हणून लोकसभेतील प्रतिनिधी सदैव अडीअडचणी, समस्या सोडविताना आपला जळगाव लोकसभा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत सतत पुढे जावा यासाठी जनतेच्या आशीर्वादाने यापुढेही अंतःकरणपूर्वक प्रयत्नशील राहतील.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
100 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.