अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-मर्यादित विभागीय केंद्रप्रमुख भरती परीक्षेसाठी सर्व प्राथमिक शिक्षक ( पहिली ते आठवी ) यांना संधी देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री , शिक्षणमंत्री व राज्याचे शिक्षण आयुक्त यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे .
याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की पुढील संदर्भीय पत्र मा. शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय , मुंबई यांच्याकडील केंद्रप्रमुख पदभरती बाबतचे पत्र क्रमांक संकीर्ण २०२२/प्र क्र.८१/टि.एन.टि -१दिनांक १ डिसेंबर २०२२ रोजीच्या पत्रानुसार मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळांमधील एकूण मंजूर केंद्रप्रमुख पदाच्या50 % पदे भरली जाणार आहेत . सदर केंद्रप्रमुख भरती परीक्षेला बसण्यासाठी वरील संदर्भीय पत्रातील मुद्दा क्रमांक 5.1 नुसार पात्रतेचा विचार करता फक्त सहावी ते आठवी वर्गाला अध्यापन करणारे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदावर तीन वर्षे काम केल्याचा अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे ही बाब प्राथमिक शिक्षक पदावर सध्या काम करणाऱ्या व तीन वर्षापेक्षा अधिक वर्षाचा अनुभव असून देखील राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील अनेक प्राथमिक शिक्षक (१ली ते ८वी इयत्तेला अध्यापन करणारे) सदर परीक्षेला बसण्यापासून वंचित राहणार आहेत . इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गाला अध्यापन करणारे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील अनेक शिक्षकांनी सेवेत कार्यरत असताना आपली शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता (बी. ए.बी. कॉम बी एड, एम एड, नेट सेट पी एच डी….) पर्यंत वाढविलेली आहे . राज्यातील अनेक प्राथमिक शिक्षक हे उपक्रमशील , कृतिशील आणि तंत्रस्नेही आहेत. सर्व प्राथमिक शिक्षकांना तंत्रज्ञान कौशल्य आणि उच्च शिक्षणाचा केंद्रप्रमुख होण्याची संधी मिळाल्यास प्रशासनामध्ये गतिमानता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी निश्चितच शासनाला फायदाच होईल.
वरील संदर्भीय शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 5.1 मधील बाब बहुतांश प्राथमिक शिक्षकांवर अन्याय करणारी व एकाच शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये दुजाभाव करणारी ठरेल म्हणून सर्व प्राथमिक शिक्षकांना उचित व योग्य न्याय मिळावा आणि केंद्रप्रमुख परीक्षेला बसून आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी . मर्यादीत विभागीय स्पर्धा परीक्षा भरती प्रक्रियेच्या विद्यमान तरतुदी व प्रक्रिया पाहता शिक्षण विभागातील लिपिक संवर्ग सर्व कर्मचारी यांना वर्ग एक व वर्ग दोन अधिकारी पदभारतीसाठी मर्यादित परीक्षेद्वारे सर्वांना समान संधी देण्यात येते. याउलट प्राथमिक शिक्षक उच्च विद्या विभूषित व तंत्रस्नेही असूनदेखील त्या सर्वांना केंद्रप्रमुख होण्याची समान संधी देण्यात येत नाही . याविषयी राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शिक्षकांमध्ये नाराजीची भावना आहे. राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संवर्ग हा कर्मचारी संख्येचा विचार करता मोठा संवर्ग असल्याने सर्वांनाच पदोन्नतीद्वारे उच्च पदावर जाण्याची खूप कमी प्रमाणात संधी उपलब्ध होते. त्यामुळे मर्यादीत विभागीय परीक्षेद्वारे केंद्रप्रमुख होण्याची सर्व प्राथमिक शिक्षकांना संधी मिळाल्यास बरे होईल.म्हणून उपरोक्त संदर्भ शासन निर्णयामध्ये शुद्धिपत्रकाद्वारे बदल होणे गरजेचे आहे. त्यासाठी किमान जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या वर्गाला अध्यापन करणारे व प्राथमिक शिक्षक पदी तीन वर्ष समाधानकारक सेवा पूर्ण करणारे सर्व प्राथमिक शिक्षक यांना सदर मर्यादित विभागीय केंद्रप्रमुख भरती परीक्षेला बसण्यासाठी संधी मिळावी. अशी पात्रता अट बदल करण्यात यावा. जेणेकरून सर्व प्राथमिक शिक्षकांना गुणवत्तेनुसार केंद्रप्रमुख होण्याची संधी मिळू शकेल ,अशी मागणी करण्यात आली आहे .यावेळी राज्याध्यक्ष गौतम कांबळे, राज्य महासचिव विठ्ठल सावंत , पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण व महासचिव मिलिंद देडगे , राज्यकोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे हे पदाधिकारी उपस्थित होते .