अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-महिलांना सत्तेने पदभार देण्याऐवजीमुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांचे रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष गौतम कांबळे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्याकडे केली आहे .याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,पुणे जिल्हा परिषदेतील मुख्याध्यापकांची अनेक पदे गेल्या बारा वर्षापासून रिक्त आहेत . तसेच केंद्रप्रमुखाची ही अनेक पदे रिक्त आहेत .मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांचे रिक्त पदे भरण्याबाबत सातत्याने आमच्या संघटनेमार्फत प्रयत्न सुरू आहे .परंतु मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदोन्नतीची प्रक्रिया राबवली जात नाही मात्र महिलांना सक्तीने केंद्रप्रमुख पदभार घेण्याबाबत आदेशित केले जात आहे .पदभार न स्वीकारल्यास कारवाई करण्याची धमकी देण्यात येत आहे .ही बाब गंभीर असून लोकशाही देशात महिलांच्या हक्क अधिकारावर गदा आणणारी आहे .ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा करून ग्रामविकास विभागाने चुकीच्या पद्धतीने काढलेले मुख्याध्यापक पदोन्नतीसंदर्भातील पत्र रद्द करण्यात यावे . मा .विभागीय आयुक्त पुणे व मा .उच्च न्यायालय मुंबई यांनी मुख्याध्यापक पदोन्नती संदर्भात पुणे जिल्हा परिषदेला दिलेल्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी .रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावीत .केंद्रप्रमुख पदाचा पदभार घेण्याबाबत कोणत्याही महिलांवर सक्ती करण्यात येऊ नये अशी विनंती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .या निवेदनाच्या प्रती
प्रधान सचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई ,
उपसचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी ,प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांना पाठवण्यात आल्या आहेत .