अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
पुणे, २४ नोव्हेंबर, २०२१:
निरंकारी संत समागम जगभरातील प्रभूप्रेमी भाविकांसाठी आनंदाची पर्वणी असते ज्यामध्ये मानवतेचा अनुपम संगम पहायला मिळतो. निरंकारी मिशन आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये सत्य, प्रेम व एकत्वाचा संदेश प्रसारित करत आले आहे. यामध्ये सकळजन आपली जात, धर्म, वर्ण, भाषा, वेशभूषा तसेच आहार यांसारख्या विभिन्नता विसरून परस्पर प्रेम व एकोप्याच्या भावनेचा अंगीकार करतात.
७४व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी यावर्षी व्हर्च्युअल रूपात पूर्ण समर्पण भावनेने आणि सजगतेने करण्यात आली आहे. संत समागमामध्ये संस्कृती आणि सार्वभौमत्वाची बहुरंगी झलक यावर्षीही व्हर्च्युअल रूपात दर्शविण्यात येईल. हा संत समागम २७, २८ व २९ नोव्हेंबर, २०२१ रोजी साजरा होणार असून समागमाचा मुख्य विषय ‘विश्वास, भक्ती व आनंद’ असा आहे.
संपूर्ण समागमाचे थेट प्रक्षेपण (Live Telecast) मिशनच्या वेबसाईटवर तसेच साधना टी.व्ही चॅनलच्या माध्यमातून केले जाणार आहे. समागमाच्या तिन्ही दिवशी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आपल्या पावन प्रवचनांद्वारे समस्त मानवमात्राला आपले पावन आशीर्वाद प्रदान करतील.
यावर्षीचा संत समागम पूर्णपणे व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात येत असला तरी त्याला जीवंत रूप देण्यासाठी मिशनकडून रात्रंदिवस अथक प्रयास केले जात आहेत ज्यायोगे जेव्हा त्याचे प्रसारण होईल तेव्हा त्याची अनुभूती आणि आनंद प्रत्यक्ष समागमाप्रमाणे घेता येईल. हे सर्व सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनानेच शक्य झाले आहे.
विश्वभरातील वक्ते, गीतकार आणि कवी सज्जन या विषयावर आपले अनुभवसंपन्न विचार, भक्तीरचना आणि कविता समागमामध्ये सादर करतील. विश्वास, भक्ती आणि आनंद हे आध्यात्मिक जागृतीचे एक असे अनुपम सूत्र आहे ज्यावर चालून आपण या परमात्म्याचा केवळ साक्षात्कारच करु शकतो असे नव्हे तर त्याच्याशी एकरूपही होऊ शकतो.
या निरंकारी संत समागमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पुणे झोनचे झोनल इंचार्जे ताराचंद करमचंदानी यांनी केले आहे.