अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बंद कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष तथा शिक्षक संघटना समन्वय समितीचे राज्य महासचिव गौतम कांबळे यांनी केली आहे .
याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की , महाराष्ट्रातील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ होण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था काम पहाते परंतु मागील काही वर्षांपासून केवळ शासकीय निधी खर्च करण्यासाठी वर्षाअखेर प्रशिक्षणाचे आयोजन करण्याचे काम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून होताना दिसत आहे . यातून शिक्षक व विद्यार्थ्यांचा शालेय वेळ वाया जातो .ही प्रशिक्षणे फेब्रुवारी व मार्च या महिन्यात घेण्यात येत असल्यामुळे वर्षा अखेरचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी येतात .डायटकडून दर्जेदार प्रशिक्षण देण्यात येत नाही त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांचा वेळ वाया जातो .तेथील कर्मचाऱ्यांची नेमणूक जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीकडे करण्यात यावी . व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातूनया कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष शाळेवर जाऊन विद्यार्थी व शिक्षक यांना मार्गदर्शन करण्यात यावे .त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे .डायटचे प्रतिनिधी स्वतः शिक्षकांना प्रशिक्षण देत नाही त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा ते वापर करून घेतात त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे . याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बंद करण्यात याव्यात .या संस्थेचा शिक्षक व विद्यार्थी यांची गुणवत्ता वाढीसाठी काहीही उपयोग होत नाही व शासनाचा खर्च वाया जात आहे.यातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व सार्वांगिण विकासासाठी तेथील कर्मचारी जिल्हा परिषद व पंचायत समिती कडे वर्ग केल्यास सध्या सर्व शैक्षणिक विभागात आधिकारी कर्मचारी यांची संख्या अपूरी असल्याची कमी देखील भरून निघून शासनाच्या पैशाची नक्कीच बचत होईल व शैक्षणिक सुधारणा होण्यास मदत होईल.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बंद करण्यात याव्यात . शिक्षकांनी प्रशिक्षण मिळावे अशी मागणी केल्यास यशदाच्या तज्ञ मार्गदर्शकामार्फत प्रशिक्षण देण्यात यावे . कोणत्याही शिक्षकास त्याच्या इच्छेविरुद्ध मार्गदर्शक म्हणून नेमण्यात येऊ नये अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांना केली आहे .यावेळी राज्य महासचिव विठ्ठल सावंत , राज्य सल्लागार दिगंबर काळे ,राज्य उपाध्यक्ष संतोष ससाणे , राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे , राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत सलवदे ,पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण , महासचिव मिलिंद देडगे , उपाध्यक्ष दीपक कदम व जयवंत पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.