पोलीस निरीक्षक के के पाटील
ज्या आरोपीविरुध्द गंभीर स्वरुपाचे शरीराविरुध्द व मालाविरुध्दचे तसेच वाळु चोरीचे गुन्हे उदा. खुन करणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत, जबरी चोरी, दरोडा, चोरी यासारखे गुन्हे दाखल आहेत व वेळोवेळी कायदेशीर कारवाई करुन तसेच कठोर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नाही व ते वारंवार गंभीर स्वरुपाचे गुन्हे करण्याच्या सवयीचे आहेत अशा धोकादायक व सराईत जास्तीत-जास्त गुन्हेगारांविरुध्द मोक्का व एम पी डी ए या कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरात वाढत्या गुन्हेगारीस थांबविण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले असून गुन्हेगारांवर लक्ष ठेऊन आहे.काही दिवसांपूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई केल्यानंतर आता एमपीडीए कायद्याअंतर्गत निखील उर्फ भोला सुनिल अजबे वय 21 वर्षे रा. नारायणवाडी, चाळीसगांव याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.निखील उर्फ भोला सुनिल अजबे याचे विरुध्द चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन येथे जिवेठार मारण्याचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, दुखापत यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीस जुलै – 2022 मध्ये 02 वर्षाकरिता जळगांव जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आलेले होते. हद्दपार कालवधी मध्ये देखील सदर आरोपीने हद्दपार आदेशाचे उल्लंघन करुन चाळीसगांव शहरामध्ये प्रवेश करुन चाळीसगांव शहरात शरीराविरुध्दचे गुन्हे केलेले होते.
आगामी काळात होणाऱ्या निवडणुका व विविध जाती-धर्माचे सण-उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी शरिराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याबाबतचे आदेश मा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी जळगांव जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना दिलेले आहेत. मा. श्री. एम. राजकुमार पोलीस अधिक्षक जळगांव यांच्या आदेशान्वये व मा. श्री. रमेश चोपडे अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगांव परिमंडळ, मा. श्री. अभयसिंह देशमुख सहा. पोलीस अधिक्षक चाळीसगांव उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहकारी पोना विनोद भोई, पोना तुकाराम चव्हाण अशांनी वर नमुद इसमाविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विना परवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळु तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणारी व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम 1981 सुधारणा अधिनियम 1996, 2009 व 2015 चे कलम 3 (1) नुसार स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव मा. पोलीस अधिक्षक सो. जळगांव यांच्यामार्फत मा. जिल्हादंडाधिकारी सो. जळगांव यांना प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता, त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किसन नजन पाटील व त्यांचे सहकारी पोहेकॉ / दामोधरे यांनी तात्काळ पुढील कारवाई करुन सदर प्रस्तावावरुन दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी मा. जिल्हादंडाधिकारी सो.जळगांव यांनी वर नमुद इसमास स्थानबध्द करण्याबाबतचा आदेश काढल्याने सदर इसमास आज दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी सपोनि. सागर ढिकले, पोना / अमित वाविस्कर, पोकॉ/ अमोल भोसले, पोकॉ/रविंद्र वच्छे यांनी अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे दाखल (स्थानबध्द) केलेले आहे.