अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या रंगाबाबत सरकारी व खाजगी शाळेतील विद्यार्थी असा कोणताही भेदभाव करू नये अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे .
याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,राज्यघटनेतील स्वतंत्र , समता व बंधुता या तत्त्वांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच गणवेश हे महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेले धोरण स्वागतार्ह आहे .
शालेय शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्यांना एकाच रंगाचा गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे .त्याबद्दल शालेय शिक्षण विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे .
सर्व विद्यार्थ्यांना एकाच रंगाचा गणवेश देताना तो राज्यातील सर्व माध्यमाच्या ,सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थातील सर्व विद्यार्थ्यांना देण्यात यावा .फक्त जिल्हा परिषद , नगरपालिका व महानगरपालिकेत शिकणाऱ्या शोषित , पीडित ,वंचित बहुजन समाजातील मुलांसाठी लागू करण्यात येऊ नये .बहुजन समाजातील मुलांसाठी शासनाने ठरवून दिलेला एकच रंगाचा गणवेश व वेगवेगळ्या माध्यमाच्या खाजगी शाळेत शिकणाऱ्या उच्चभ्रू मुलांसाठी वेगळा गणवेश असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यात येऊ नये .खाजगी संस्थेतील वेगवेगळ्या माध्यमाच्या शाळेत शिकणारी मुलेही श्रीमंत व उच्चभ्रूंची असतात .या संस्थाही श्रीमंत व उच्चभ्रू लोकांच्या , राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आहेत .तसेच त्यांना देण्यात येणारे शासकीय अनुदान हे सरकारी शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानापेक्षा अधिक असते .शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गणवेशात एक सारखेपणा न ठेवल्यास राज्यघटनेतील समानतेच्या तत्वाला तडा जाईल .तसेच मोफत व सक्तीचा अधिनियम 2009 या कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाही अशा प्रकारचा संदेश समाजात जाईल . वंचित , शोषित पिढीतील विद्यार्थी व उच्चभ्रू समाजातील विद्यार्थी यांच्यामधील दरी वाढत जाईल . आणि याचे फलित हे समाज व्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम करणारे असेल व एक संघ समाजरचनेसाठी हे धोकादायक असेल असे संघटनेचे मत आहे .म्हणून निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आलेली आहे की ,राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थातील विद्यार्थ्यांसाठी एकाच रंगाचा गणवेश असावा या आपल्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे समर्थन आहे .यापेक्षा वेगळी भूमिका घेतल्यास संघटनेला तीव्र आंदोलन उभारावे लागेल याची नोंद घ्यावी असा इशाराही या निवेदनात देण्यात आलेला आहे .या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आल्या आहेत .