अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-पुणे जिल्हा परिषदेतील मुख्याध्यापक पदोन्नती गेली १२ वर्षे रखडलेली असून याला ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी केला आहे .ग्रामविकास विभागातील भ्रष्टाचार बाहेर काढावा अशी मागणी शिक्षकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आमदार प्रशांत बंब यांच्याकडे केली असल्याची माहिती श्री गौतम कांबळे यांनी दिली .
आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की पुणे जिल्हा परिषदेतील मुख्याध्यापक पदोन्नती १२ वर्षापासून रखडलेली आहे .या मुख्याध्यापक पदोन्नतीमध्ये विभागीय आयुक्त पुणे व मा . उच्च न्यायालय मुंबई यांनी आदेश देऊनही मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रक्रिया राबवली जात नाही , याला ग्रामविकास विभागातील अधिकारी जबाबदार असून तेथे मोठा भ्रष्टाचार झाला आहे . याची गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची गरज असल्याची माहिती आमदार प्रशांत बंब यांना देण्यात आली असून आमदार प्रशांत बंब यांनी चौकशीसाठी पाठपुरावा करावा अशी विनंती महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने त्यांना करण्यात आली आहे .