संपादक गफ्फार शेख
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार “नॉन मिलियन प्लस सिटीज’ अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत नगरपालिका क्षेत्रात विविध उपाययोजनांसाठी शासनाच्या नगरविकास विभागाने भरीव निधीची तरतूद केली आहे. यात पाणी साठवण व घनकचरा व्यवस्थापनासाठी चाळीसगाव नगरपालिकेला १ कोटी २१ लाख ६७ हजार ८५८ रुपये रुपयांचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे तसेच अबंधनकार/मूलभूत अनुदानातून ८० लाख ५९ हजार ८५२ रुपये निधी असा या दोन्ही योजनेतून चाळीसगाव नपा २ कोटी २ लाख २७ हजार ६८३ रुपयांचा निधी मिळणार आहे.त्यामुळे वित्त आयोगाच्या निधीतून नपा मालामाल होणार आहे. १५व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार नॉन मिलियन प्लस सिटीज अंतर्गत सन २०२२-२३ वर्षातील पिण्याचे पाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी बंधनकारक अनुदानाचा पहिला हप्ता वितरित करण्यास नगर विकास विभागाने मान्यता दिली आहे.या अनुदानातून शासनाने निर्देशित केलेली कामे संबंधित उपाय योजनेच्या विनियोगासाठी करणे बंधनकारक आहे.यात ड वर्ग महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यासाठी २८६.५० कोटी रुपयांचा हप्ता वितरित केला जाणार आहे. यात १ कोटी २१ लाख ६७ हजार ८५८ रुपये चाळीसगाव नगरपालिकेला मिळणार आहे. याबाबतचे आदेश गुरुवारी कार्यासन अधिकारी महेंद्र दळवी यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले. राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना हा निधी वितरित होणार आहे.