Oplus_16908288

बातमीत प्रतिकात्मक चित्राचा वापर केला आहे

अधिकार आमचा न्युज नेटवर्क

संपादक गफ्फार शेख (मलिक)

जळगाव(प्रतिनिधी)-वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्याच्या बदल्यात १५ हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित) एका सहाय्यक अभियंत्यासह दोन वरिष्ठ तंत्रज्ञांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई १४ नोव्हेंबर २०२६ रोजी जळगाव येथील पांडे चौक परिसरात करण्यात आली.

विशाल वसंत नेमाडे (वय ३३, सहाय्यक अभियंता), भरत कडू तायडे (वय ४५, वरिष्ठ तंत्रज्ञ) आणि रवींद्र छबु पाटील (वय ४१, वरिष्ठ तंत्रज्ञ) अशी लाच प्रकरणी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी एका ४० वर्षीय नागरिकाने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. दिनांक १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी आरोपींनी तक्रारदाराच्या घरी जाऊन नवीन वीज मीटरची तपासणी केली. यावेळी ‘घरातील विद्युत उपकरणांचा लोड जास्त असून सर्व्हिस वायर बायपास करून वीज चोरी होत आहे’, असे त्यांनी तक्रारदाराला सांगितले. तसेच, वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला ४०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ला.प्र.वि. जळगाव येथे तक्रार नोंदवली.

तक्रारीच्या पडताळणीदरम्यान तडजोडीअंती १५ हजार रुपये लाच देण्याचे निश्चित झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने पांडे चौक येथे सापळा रचला. यावेळी आरोपी भरत तायडे याच्या सांगण्यावरून आरोपी विशाल नेमाडे याला तक्रारदाराकडून १५,००० रुपयांची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.

सध्या तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून जळगाव येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक नाशिक भारत तांगडे व पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे आणि त्यांच्या पथकातील पो.हवा. बाळू मराठे, पो.कॉ. राकेश दुसाने, पो.कॉ. मनोज पाटील यांनी केली आहे.

About The Author

By admin

पत्रकारिता क्षेत्रात गत १३ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा ७ वर्षांचा अनुभव.राजकारण,नगरपालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. लोकसभा, विधानसभा, नपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 8999957772

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!