अधिकार आमचा न्युज नेटवर्क संपादक गफ्फार शेख (मलिक) वनविभागाच्या तत्परतेने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट मादीची सुखरूप सुटका; वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात सोडणार भडगाव(प्रतिनिधी)-भडगाव तालुक्यातील भोरटेक येथे शिकारीच्या शोधात असताना एका शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट मादीची वनविभागाने अथक प्रयत्नांनंतर सुखरूप सुटका केली. वनविभागाच्या तत्परतेने आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे बिबट मादीला जीवनदान मिळाले असून, या बचावकार्याचे परिसरातून कौतुक होत आहे. भोरटेक येथील शेतकरी अशोक माणिकराव देशमुख यांच्या गट क्रमांक ११७ मधील शेतातील विहिरीत बिबट मादी पडल्याची घटना घडली. सकाळी शेतात गेलेल्या अशोक देशमुख यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच चाळीसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल पिंडकुरवार यांनी कर्मचाऱ्यांसह बचावकार्यासाठी आवश्यक साहित्याची जमवाजमव सुरू केली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी कजगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षकांशी संपर्क साधत पोलीस बंदोबस्ताची मागणी केली. दरम्यान, वनरक्षक सुरेश काळे, रविंद्र पवार, अजय महिरे, ललित पाटील, काळू पवार आणि उमेश सोनवणे यांना घटनास्थळी रवाना करण्यात आले. माजी सरपंच, शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मदतीने प्रथम विहिरीत एक बाज सोडण्यात आली. काही वेळातच बिबट मादी त्या बाजेवर येऊन बसली. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल पिंडकुरवार या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या. वनकर्मचारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने सोबत आणलेला पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. काही क्षणांतच बिबट मादी पिंजऱ्यात जाऊन बसली. त्यानंतर पिंजऱ्याचे गेट बंद करून तो सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढण्यात आला. बचावकार्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप भट्ट यांनी बिबट मादीची वैद्यकीय तपासणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. ही संपूर्ण कार्यवाही वनसंरक्षक (प्रा.) धुळे नीनू सोमराज, उपवनसंरक्षक जळगाव राम धोत्रे, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) जळगाव अमोल पंडित आणि मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बचावकार्यात वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल पिंडकुरवार, वनपाल दीपश्री जाधव, वनरक्षक सुरेश काळे, रविंद्र पवार, अजय महिरे, ललित पाटील, काळू पवार, उमेश सोनवणे, के. बी. पवार, वनमजूर अशोक पाटील, भटू अहिरे, वनसेवक बापू पाटील, अजय पवार, गोपाळ पाटील, राकेश चौधरी, वाहनचालक धीरज पाटील आणि प्रविण मुंगसे यांनी सहभाग घेतला. कजगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच भोरटेक ग्रामस्थांनीही बचावकार्यात मोलाचे सहकार्य केले. वनविभागाची तत्परता, कर्मचाऱ्यांचे नियोजन आणि ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे विहिरीत अडकलेल्या वन्यजीवाला सुरक्षितपणे बाहेर काढणे शक्य झाले. About The Author admin पत्रकारिता क्षेत्रात गत १३ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा ७ वर्षांचा अनुभव.राजकारण,नगरपालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. लोकसभा, विधानसभा, नपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 8999957772 See author's posts Views: 121 Post navigation दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी चाळीसगाव पोलिसांचा पायी रूट मार्च