
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- दि. २९ जून २०२५ कन्नड घाटात आढळून आलेल्या संशयास्पद प्रेतप्रकरणाचा पोलिसांनी केवळ १२ तासांत छडा लावला असून, तीन आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले आहे.
दिनांक २९ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कन्नड घाटात एक अनोळखी पुरुष जातीचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृताची ओळख पटवणे हे एक मोठे आव्हान होते. मात्र पोलिसांनी मृताच्या अंगावरील वस्तू आणि खुणा यांच्या आधारे सोशल मीडियावर माहिती प्रसारित करून मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्यातून सदर मृत इसम हा जगदीश जुलाल ठाकरे (रा. मोरदड, ता. जि. धुळे) असल्याचे निष्पन्न झाले.
धुळे तालुका पोलीस ठाण्यात या इसमाबाबत हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. यानंतर मृताची पत्नी अरुणा जगदीश ठाकरे यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देत सांगितले की, मोरदड गावातील शुभम सावंत, अशोक मराठे व एका अनोळखी तरुणाने वाढदिवसाला नेण्याचे कारण सांगून त्यांना घरातून बाहेर नेले व त्यानंतर खून करून मृतदेह कन्नड घाटात फेकून दिला.
या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात भाग-५ गु.र.नं. १९६/२०२५ अन्वये भा.दं.वि. कलम १०३(१) सह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक सौ. कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकांनी १२ तासांच्या आत संशयित आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून मृताचा गोळी झाडून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या तपासकार्यामध्ये पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनि प्रदीप शेवाळे, पोउपनि राहुल राजपूत, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि शेखर डोमाळे, पोकॉ. महेश पाटील, भूषण शेलार व चालक बाबासाहेब पाटील यांचे विशेष योगदान आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते हे करीत आहेत.