गहुंजे, हिंजवडीसह काही गावे पिंपरी- चिंचवड महापालिकेत समाविष्ट करून घेण्याबाबत पुन्हा जोरदार हालचाली सुरू

प्रतिनिधी सनी घावरी
चिंचवड(प्रतिनिधी)-गहुंजे, हिंजवडीसह काही गावे पिंपरी-
चिंचवड महापालिकेत समाविष्ट करून घेण्याबाबत पुन्हा
जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. 11 गावे पालिकेत
समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने पालिका आयुक्तांचा प्रस्ताव
आला आहे. त्यावर पुढील कारवाई करण्यासाठी विभागीय
आयुक्तांचा अभिप्राय मागविण्यात आला आहे. अभिप्राय
प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे
राज्याच्या नगरविकास खात्याने सांगितले आहे.
हिंजवडी, गहुंजे, जांबे, मारुंजी, माण, नेरे आणि सांगवडे ही सात गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी भाजपचे
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी 4 मार्च 2020 रोजी राज्य सरकारकडे केले होती.आमदार जगताप यांनी पत्रात म्हटले होते की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नगरविकास विभागाकडे हिंजवडी,गहुंजे, जांबे, मारुंजी, माण, नेरे आणि सांगवडे या पालिका क्षेत्रा लगत असलेल्या गावांचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे.
देशात आयटी क्षेत्रात नामांकित असलेले हिंजवडी आयटी हबव गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचा विकास होत आहे.
मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास
ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणावर अपयश येत आहे. वाढत्या
लोकसंख्येमुळे या परिसराचा बकालपणा वाढत आहे.
या गावातील ग्रामपंचायती निधी अभावी सार्वजनिक सेवा,
सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे कचरा,
पाणीपुरवठा, रस्ते, पथदिवे असे प्रश्न या भागात भेडसावत
आहेत.
या गावांचा सर्वांगीण विकास नियोजनबद्ध होणे आवश्यक
आहे. त्यासाठी ही गावे पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात
समाविष्ट केल्यास विकास होणे सोईचे होईल. त्यामुळे या
गावांना महापालिकेत समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्याची मागणी त्यांनी केली होती.
आमदार जगताप यांच्या पत्राला राज्य सरकारचे उपसचिव
सतीश मोघे यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले
आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेत 11 गावे समाविष्ट
करण्याच्या अनुषंगाने आयुक्तांचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे.
त्यावर पुढील कारवाई करण्याच्या दृष्टीकोनातून विभागीय
आयुक्तांचा अभिप्राय मागविण्यात आला आहे. अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात येईल.