अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-पंचायत समिती दौंड येथील शिक्षण विभागाच्या अधीक्षक व लिपिकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे .
याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की ,पंचायत समिती दौंड येथील शिक्षण विभागातील अधीक्षक व लिपिक अत्यंत बेजाबाबदारपणे वागत आहेत .पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीचे पत्र दिनांक २२ जुलै २०२२,२८ जुलै २०२२ व ०१ ऑगस्ट २०२२ या तारखांना तीन वेळा प्रसिद्ध करण्यात आले परंतु पंचायत समिती दौंड येथील शिक्षण विभागातील अधीक्षक व संबंधित लिपिक यांनी कोणतीही दखल घेतली नाही व त्या पत्रांची अंमलबजावणी केली नाही .मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या उपशिक्षक व पदवीधर शिक्षकांच्या दिनांकीत सह्या दिनांक ०१ ऑगस्ट २०२२ ला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत घेतलेल्या नाहीत .यांच्या हलगर्जीपणामुळे मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रकिया राबवण्यात अडचणी निर्माण होत आहेत . तसेच यांच्या चुकांमुळे अनेक शिक्षक पदोन्नतीपासून वंचित राहणार आहेत .या चुकास जबाबदार असणाऱ्या अधीक्षक व लिपिक यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी .यांची शिक्षण विभागातून दुसऱ्या विभागात तात्काळ बदली करण्यात यावी .कामचुकार लिपिकांची बदली न केल्यास पंचायत समिती दौंड येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशी विनंती पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आले आहे .या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद पुणे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) जिल्हा परिषद पुणे यांना मेलद्वारे पाठवण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी दिली .