औरंगाबाद:-जगभर कोरोना विषाणू्चे सावट असताना हातावर पोट असणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे पण त्यावर नारळीबाग मित्र मंडळाने “कम्युनिटी किचन” ची स्थापना करून उपाय शोधला आहे.
औरंगाबाद शहर हे तसे औद्योगिक दृष्ट्या महत्वाचे शहर आहे शिवाय रोजगार व राहण्याच्या दृष्टीने सर्वसामान्यांना महागाईच्या काळात परवडणारे शहर असल्याने महाराष्ट्र भरातून रोजगारासाठी लाखो नागरिक मोल मजुरी साठी शहरात स्थायिक झाले आहेत पण कोरोनाच्या वाढत्या प्रभावमुळे शासनाने लॉक डाऊन चा निर्णय जाहीर केल्याने अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करीत असताना नारळीबाग वासियांचा कम्युनिटी किचनचा अभिनव उपक्रम गरजूंना दिलासा देणारा ठरला आहे.
दि.२८ मार्च पासून तब्बल १०० तरुणांच्या प्रयत्नातून व नागरिकांच्या उस्फुर्त सहभागातून हा उपक्रम सुरू झाला व आज घडीला सुमारे १५०० नागरिकांची भूक या माध्यमातून भागवली जात आहे.
नारळीबाग येथील युवकांनी या साठी केलेली कामाची विभागणी मुळे हा उपक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झाला आहे.
या कम्युनिटी किचन साठी युवकांची एक टीम प्रत्येक घरात जाऊन सकाळी 9 ते 10 या वेळेत लाऊस्पिकर द्वारे प्रत्येक घरातून पोळ्याचे संकलन करते एका घरातून किमान दोन पोळ्या संकलित केल्या जातात पण अनेक नागरिक शक्यतो अधिक पोळ्यांची मदत करतात.यात शासन निर्देशांनुसार सोशल डीस्टनसिंग चे काटेकोर पालन केले जाते हे विशेष.
एक टीम पोळ्या संकलित करत असताना एक टीम भाजी बनविण्यासाठी भाज्यांची स्वछता करणे व भाजी भात बनविण्यासाठी पूर्वतयारी ची आवश्यक ती कामे करतात ही कामे करत असताना हॅण्ड ग्लोव्हज,टोपी चा कटाक्षाने वापर केला जातो. भाजी भात बनविण्यासाठी युवक व काही नागरिक स्वखुशीने पैसे वस्तू देतात ज्यातून रोज वेग वेगळी चविष्ट भाजी बनवली जाते ज्यात कुठल्याही प्रकारे दर्जाशी तडजोड केली जात नाही.
भाजी भात व पोळी यांची पॅकिंग करण्यासाठी एक टीम सज्ज असते जी पटापट ह्या सगळ्यांची पाकिटे तयार करतात
अन् शेवटची एक टीम ही पॅकिंग केलेली पाकिटे घेऊन शहरातील विविध झोपडपट्ट्या,उड्डाणपूल,रस्त्यावरील बेघर नागरिक,झोपड्यांमध्ये राहणारे व पायपीट करत गावाकडे जाणाऱ्या गरजू नागरिकांपर्यंत हे फूड पाकिटे पोचवतात.
अनेक ठिकाणी ही फूड पाकिटे पोहचविले जात असल्याने गरजे नुसार नागरिक फोन वरून संपर्क साधून ही फूड पाकिटे मागून घेतात.
नारळीबाग येथील नागरिकांच्या ह्या उपक्रमामुळे लॉक डाऊन च्या काळात गरजूंना आधार देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने आपल्या जेवणातील फक्त दोन पोळ्या भाजी दिल्यास शहरातील एक ही गरजू उपाशी राहणार नाही कम्युनिटी किचन चालू करण्यासाठी सुज्ञ नागरिकांनी पुढाकार घ्यावा व प्रत्येक वसाहतीत असे कम्युनिटी किचन सुरू करावे प्रत्येक वसाहतीतील आर्थिक दृष्ट्या सधन असणाऱ्यांनी अश्या उपक्रमासाठी साठी मदत करावी असे आवाहन नारळी बाग मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.