अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव (प्रतिनिधी) : कर्म. आ.मा. पाटील कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक व मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सतीश मस्के यांनी संपादित केलेल्या ‘ आंबेडकरी योद्धा ‘(प्रा. गौतम निकम गौरव ग्रंथ) या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक,विचारवंत उत्तम कांबळे यांच्या हस्ते इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. श. ना.देशपांडे सभागृहात संमेलनाध्यक्ष डॉ. मिलिंद बागूल, प्रा.गौतम निकम, संमेलनाचे स्वागताध्यक्ष व नाशिक विभागाचे माजी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, संयोजक भास्कर अमृतसागर, जळगावचे सामाजिक कार्यकर्ते मुकुंद सपकाळे, एरंडोलचे सामाजिक कार्यकर्ते शालिग्राम गायकवाड, खैरनार सर व सुनंदा निकम आदींच्या उपस्थित पार पडला.
धुळे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक अकादमीच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले स्मृतिदिनानिमित्त पहिले आंबेडकरी विचार शिक्षक संमेलन घेण्यात आले. या संमेलनातच ‘आंबेडकरी योद्धा’ प्रा. गौतम निकम गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.प्रा. डॉ. सतीश मस्के यांचे यापूर्वी ‘दाटून आलेल्या कळा’ कवितासंग्रह ‘हंबरडा ‘कथासंग्रह ‘खानदेशातील आंबेडकरी चळवळ खंड १'(संपादित) इत्यादी पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यांनी विविध राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग घेऊन शोधनिबंध सादर केलेले आहेत.प्रा. गौतम निकम यांनी विद्यार्थिदशेपासून फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीत झोकून देऊन केलेले कार्य, साहित्य क्षेत्रातही त्यांनी समाज सुधारकांचे चरित्र, आदिवासींचे जननायक, संतांची चरित्रे असे एकूण 80 पुस्तकाच्या लेखनाचे केलेले कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावे व येणाऱ्या तरुण पिढीला, कार्यकर्त्याला प्रेरणा,स्फूर्ती ,मार्गदर्शन मिळावे आणि कार्यकर्त्याचा ही समाजाकडून गौरव व्हावा, त्याचबरोबर कार्यकर्त्यातही पुन्हा जोमाने काम करण्याची ऊर्मी निर्माण व्हावी या उदात्त हेतूने डॉ.सतीश मस्के यांनी गौरव ग्रंथाची निर्मिती केली आहे. संमेलनाला महाराष्ट्रातून आलेले शिक्षक व धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते व अनेक श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना झाल्टे यांनी तर आभार दिनेश चव्हाण यांनी मानले.