जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण बरा होऊन घरी गेला ,डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.

Read Time7 Minute, 35 Second


जळगाव, ( वृत्तसेवा) दि. 15 – कोरोना विषाणूचा संसर्ग जगभर फैलावत असताना जळगाव शहरातील मेहरुण येथील व्यक्ती जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळून आला होता. तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यापासून या रुग्णांवर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरु होते.
शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे 14 दिवसानंतर व 15 दिवसानंतर दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने तब्बल 17 दिवसानंतर या रुग्णाला आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचारात बरा झाल्याने रुग्णांचा चेहऱ्यावर तर आनंद होताच, मात्र त्याला बरे करण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेले कोरोना संसर्ग वार्डात काम करणारे डॉक्टर, पारिचारिका, कर्मचारी यांच्या चेहर्यावरुनही आनंद ओसंडून वाहत होता. त्यामुळे या सर्वानी टाळ्या वाजवून संबंधित पॉझिटीव्ही बरे झाल्याचा आनंद व्यक्त केलस. यानंतर डिस्चार्ज पेपर देवून, रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णाला घरी सोडण्यात आले.
17 दिवसात रुग्ण बरा
मुंबई येथील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात हा रुग्ण आला होता. यानंतर घरी परतल्यानंतर त्याला कोरोना सदृश्य लक्षणे सुरु झाल्यानंतर संबंधित रुग्ण 27 मार्च रोजी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल झाला होता. त्याचा स्वॅब घेवून तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला होता. 28 मार्च रोजी त्याचा नमुना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल महाविद्यालय प्रशासनाला प्राप्त झाला. हा व्यक्ती जिल्ह्यातील पहिलाच कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन त्याच्यावर उपचार करण्यात आले. या कालावधीत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्यात. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तयेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर महाविद्यालयात तपासणी, उपचार करण्यात आले. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तीचा 14 दिवसानंतरचा तसेच 15 दिवसानंतर असे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. 13 एप्रिल रोजी रोजी 14 दिवसानंतर तपासणी अहवाल निगेटीव्ह असल्याचा तर 14 एप्रिल रोजी 15 दिवसानंतर तपासणी निगेटीव्ह असल्याचा अहवाला प्राप्त झाला. दोन्ही अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार तो कोरोना मुक्त झाल्याने त्याला आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.
उपचार करणारे डॉक्टर, परिचारीका व कर्मचारी ठरले हिरो
कोरोना संसर्ग वार्डात पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी तीन शिप्टमध्ये डॉक्टर, पारिचारिक असा एकूण 36 जणांचा स्टॉप अहारोत्र कार्यरत होता. यात शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील, डॉ. विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मिलिंद पवार, डॉ. मारुती पोटे, डॉ. दत्तात्रय बिराजदार, विजय पंचलवार, सुयोग चौधरी, अमित भंगाळे, पारिचारिका व कर्मचारी, नेहा चौधरी, रोहन केळकर, शालीनी खानापूरकर, डॉ. प्रसाद, तुषार सोनवणे, गजानन चौधरी, सविता अग्नीहोत्री, जयश्री जोगी, सरला बागुल, नम्रता खानापूरकर, कविता तायडे, सुमित्रा वक्ते, लता त्रिमाली, मनिषा सोळुंखे, शंकुतला सुरवाडे, निलम पाटील यांनी अहारोत्र रुग्णांची सेवा केली. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करुन त्याला 17 दिवसात बरे करणारे हे सर्व खरे हिरो ठरले. या कालावधीत जिल्हा सामान्य रुगणालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे यांचेही सहकार्य लाभले.
डॉक्टर, परिचारीका, कर्मचारी हे देवदूत ठरल्यानेच पुर्नजन्म झाला…
कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर मी प्रचंड घाबरलो होतो. पुन्हा बरा होवून घरी परतेल, असे वाटले नव्हते. माझे कुटुंबही तणावात होते. मात्र वैद्यकीय महाविद्यालयात अत्यंत चांगल्या पध्दतीने उपचार झाले, अगदी कुटुंबातील सदस्य समजूनच येथील कर्मचाऱ्यांनी माझ्यावर उपचार केले आणि मी 17 दिवसात बरा झालो. माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारीका, कर्मचारी हे सर्व माझ्यासाठी देवदूत ठरले. त्यांच्यामुळेच मला पुर्नजन्म मिळाला असून मी खूप आनंदी आहे. माझ्यावर उपचार करणारे सर्व डॉक्टर, परिचारीका व कर्मचाऱ्यांचा मी खूप खूप आभारी आहे, अशी प्रतिक्रिया संबंधित रुग्णाने महाविद्यालयाच्या कोरोना संसर्ग वॉर्डातून घरी जाताना व्यक्त केली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमानी जयंती उत्सव समिती चाळीसगांव तर्फे जाहीर आभार-
Next post दौंड शहर पोलिसांची कारवाई टावळखोरांकडून 54000 हजाराचा दंड वसूल
error: Content is protected !!
%d bloggers like this: