अधिकार आमचा(विशेष): आज दि २६/१२/२०१९ रोजी माणसातल्या देवाचा जयंती दिवस. जो हीन – दीन, दुबळे- आजारी, अंधश्रध्द – आदिवासींची सेवा – शुश्रूषा करतो, त्यांना मोफत वैद्यकिय सेवा-मुलांना शिक्षण देऊन त्यांना माणूस म्हणून स्वतःच्या पायावर उभे करतो. ती माणसे त्या देवमाणसावर प्रेम करतातच पण रानटी जनावरे-श्वापदे, सरपटणारे प्राणी सारे सारेच त्यांना आपले मानतात. ती जनावरे त्यांच्यावर खुप प्रेम करतात असे अद्भूत अवलीया, मॅगसेसे पुरस्कार विजेते, भारतभूषण डॉ. मुरलीधर (बाबा)आमटे यांना जन्मदिना निमित्त जयंतीनिमित्त शब्द प्रपंच. .समाजाने दूर लोटलेल्या कुष्ठरोग्यांवर प्रेमाची पाखर घालणारे, त्यांच्यातला आत्मसन्मान जागवणारे, त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद जागवणारे बाबा म्हणजेच मुरलीधर देविदास आमटे.
बाबांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ साली वर्धा जिह्यातल्या हिंगणघाट या गावी झाला. बाबांचं घराणं सधन जहागीरदाराचं. त्यांचे वडील देविदास ब्रिटिश सरकारमध्ये अधिकारी होते. मुरलीधर आमटे यांना त्यांच्या लहानपणीच बाबा हे टोपणनाव मिळालं होतं.
बाबांनी कायद्याचं शिक्षण घेतलेलं होतं आणि वर्धा येथे त्यांनी वकिलीही केली. ते यशस्वी वकील म्हणून नावाजले होते. पण तिथे त्यांचं मन रमलं नाही. त्यांनी वकिली सोडून स्वातंत्र्य चळवळीत स्वत:ला झोकून दिलं. बेचाळीसच्या चलेजाव चळवळीत त्यांना कारावासाची शिक्षाही झाली. महात्मा गांधींच्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात काही काळ वास्तव्य केल्यानंतर गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला. म. गांधींबरोबरच रविंद्रनाथ टागोर, विनोबा भावे आणि साने गुरुजी ही बाबांची श्रद्धास्थानं होती.
१९४६ साली त्यांचा साधना गुलेशास्त्रींशी विवाह झाला. साधनाताई बाबांच्या सर्व सामाजिक कार्यांमध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी झाल्या आणि आयुष्यभर त्यांना साथ दिली.
बाबा एकदा मुसळधार पावसात रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या कडेला भिजत, विव्हळत असहाय्यपणे पडलेल्या एका कुष्ठरोग्याला त्यांनी पाहिले आणि त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलला. बाबांनी स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिलं. महारोग्यांच्या पुनर्वसनासाठी आनंदवन हा आश्रम आणि अपंगांसाठी आणि समाजातल्या रंजल्या-गांजल्यांसाठी आणखी दोन आश्रम सुरू केले. पर्यावरण, वन्यप्राणी संरक्षण आणि नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतरही अनेक सामाजिक-पर्यावरणसंबंधित चळवळींमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं.
ज्या काळात त्यांनी महारोग्यांच्या पुनर्वसनाचं कार्य हाती घेतलं, त्या काळात महारोग हा महाभयंकर समजला जात होता. महारोग्यांना कुणी जवळ करीत नसे. त्यामुळे त्यांच्या नशिबी अस्पृश्यांसारखे जीणे येत असे. असहाय्य रोगाने गांजलेले हे रोगी त्यामुळे मानसिकरित्याही खचून जात असत. समाजात त्यांना वावरताही येत नसे. त्या काळात असाही गैरसमज होता की महारोग हा संसर्गजन्य असतो. जनमानसातला हा गैरसमज दूर करण्यासाठी बाबांनी एका महारोग्याचे जंतू आपल्या नसांत इंजेक्शनने टोचून घेतले.
आज आनंदवनात एक सुसज्ज हॉस्पिटल आहे, शाळा आहे आणि अनाथाश्रमही आहे. आनंदवनात पाच हजारांपेक्षाही जास्त लोक वास्तव्याला आहेत. आनंदवन’चा प्रकल्प जगातील एक मान्यताप्राप्त प्रकल्प आहे. समाजकार्याबरोबरच मोजकंच पण अतिशय सशक्त लेखनही त्यांनी केलं.ज्वाला आणि फुले’ हा त्यांचा कवितासंग्रह अनेक तरुणांना प्रेरणा देऊन गेला. उज्ज्वल उद्यासाठी’ हा काव्य संग्रह आणिमाती जागवील त्याला मत’ ही त्यांची पुस्तकंही गाजली.
बाबांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आलं. कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणार्यांसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे अमेरिकेचा डेमियन डट्टन पुरस्कार. हा पुरस्कार त्यांना १९८३ मध्ये प्रदान करण्यात आला. १९८५ साली आशियाचं नोबेल पारितोषिक समजले जाणारे रेमॉन मॅगसेसे पुरस्कारानं त्यांना सन्मानीत करण्यात आलं आणि संयुक्त राष्ट्र’ने १९९१ आणि १९९८ साली त्यांचा सन्मान केला. या व्यतिरिक्त त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. भारत सरकारने १९७१ साली पद्मश्री आणि १९८६ साली पद्मविभूषण देऊन त्यांना सन्मानीत केलं. महाराष्ट्र सरकारचा सावित्री बाई फुले पुरस्कार त्यांना १९९८ साली देण्यात आला आणि २००४ साली त्यांनामहाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलं.
गेली काही वर्षं त्यांना शारीरिक व्याधीमुळे बसता येत नव्हतं, त्यांना सतत झोपून राहावं लागायचं. पण तरीही त्यांच्या कार्यांमध्ये कोठेही खंड पडला नाही. २००७ साली त्यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि अखेर ९ फेब्रुवारी २००८ साली वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
त्यांची दोन्ही मुलं विकास आणि प्रकाश आणि सुना मंदाकिनी आणि भारती हे सर्व डॉक्टर आहेत आणि वडिलांचा समाजकार्याचा वारसा समर्थपणे सांभाळीत आहेत. त्यांच्या नातवंडांची तिसरी पिढीही आता समाजकार्यासाठी सज्ज आहे.
पद्मश्री बाबा आमटे म्हणजे समाज सेवेचा प्रेरणास्रोत आजही सामाजिक कार्य करणाऱ्यांसाठी मोठा दीपस्तंभ आहेत जयंतीनिमित्तत्यांच्या शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीच्या वतीने विनम्र अभिवादन
किशोर पाटील कुंझरकर.
राज्य समन्वयक राज्य समन्वय समिती शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य.
Read Time8 Minute, 5 Second