दौंड करांच्या समस्या संपणार कधी….

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
महिला प्रतिनिधी योगिता रसाळ
दौंड(प्रतिनिधी): दि-१७ मार्च २०२३ रोजी झालेल्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा दौंडकरांच्या समस्यांमध्ये भर घातली आहे. दळणवळणाच्या सोयीसाठी बनवण्यात आलेली नवीन मोरी पावसाच्या पाण्याने तुडुंब भरली आहे. त्यामुळे आजची सकाळ दौंडवासीयांना समस्यांचा दिवस घेऊन उगवली आहे.
दौंड शहरात मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग, मंडईची भाजी विक्रेते,फुल विक्रेते,दूधवाले, रोजंदारी कामगार, मजूर वर्ग,आणि शाळकरी मुलांना दिवसातून अनेक वेळा या मोरीतुन येणे जाणे करावे लागते. दळणवळणाचा मार्ग असल्याने रहदारी मोठ्या प्रमाणावर असते. परंतु अवकाळी पावसाच्या पाण्याने तुंबलेल्या मोरीमुळे दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शाळकरी मुलांचेही यातूनच येणेजाणे होत असल्याने या मुलांचा शाळेचा गणवेश खराब होत आहे.
यात अजून एक भर म्हणून की काय जुन्या मोरीमध्ये जी लाईटची सोय होती,ती आज पर्यंत पूर्ववत करण्यात आली नसल्याने, रात्रीच्या वेळी यातून येणे-जाणे करताना गैरसोय होत असून, हे रहदारीसाठी धोक्याचे झाले आहे.नेमकी कधी या मोरीची समस्या कायमस्वरूपी सुटेल माहीत नाही मात्र लोकप्रतिधींनी या गंभीर समस्येवर तात्पुरती पर्यायी उपाययोजना तरी करावी अशी मागणी जनसामान्यांकडून होत आहे.