अवैध वाळू उपसा, माफियांचा ‘रात्रीस खेळ चाले’,महसूल विभागाचे दुर्लक्ष……

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक(शेख)
चाळीसगाव(प्रतिनिधी)-अवैध वाळू उपसा व वाहतूक माफियांचा ‘रात्रीस खेळ चाले’ कारवाई कडे महसूल विभागाचे दुर्लक्ष मेहुनबारे येथून सर्रास पणे वाळू उपसा करत रेल्वे पुलावरून रात्रीच्या वेळी वाळू माफियांकडून वाहतूक करण्यात येते.
वाळू माफियांकडून मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करत वाहतूक करण्यात येत आहे. मात्र, वाळू माफियांच्या अवैध वाहतूक व वाळू उपश्याकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे चाळीसगाव परिसरात राजरोसपणे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू आहे.दि 17 नोव्हेंबर रोजी रात्री धुळे रोड वरील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालया पासून ते कॉलेज पॉईंट पर्यंत वाळू पडलेली होती सुदैवाने अपघात होता होता वाचले वेळीच जागृक नागरिकांनी नगरपालिका प्रशासनास कळविल्याने तात्काळ नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सफाई केली, मात्र सर्रास सुरू असलेला वाळू उपसा व वाहतूक महसूल विभागाच्या लक्षात येत नाही की सोईस्कर पणे दुर्लक्ष केले जात आहे,हा सर्व प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून राजरोसपणे सुरू असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी माध्यमांकडे केली आहे.
शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक करण्याचा हा गोरखधंदा चाळीसगाव परिसरात सध्या फोफावताना दिसत आहे. अवैधरीत्या वाळूची मोठ्या प्रमाणावर राजरोस चोरटी वाहतूक करण्यात येत आहे. या चोरट्या वाहतुकीकडे संबंधित महसूल विभाग, वाहतूक स्थानिक पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे माफियांचे फावत आहे. परिणामी शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडून नुकसान होत आहे. याच अवैध वाहनांच्या सुसाट वेगामुळे अपघात झाल्यास अनेकांना आपले प्राणही गमावावे लागू शकतात विनाक्रमांक धावणाऱ्या डंपर व ट्रॅक्टर ट्रॉली मधून ही चोरटी वाळू वाहतूक सुरू आहे. माफियांच्या वाढत्या दहशतीमुळे तसेच प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ‘मधुर संबंधामुळे’ सर्वकाही सुरळीत सुरू असल्याची खंत परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
16 तारखेला पहाटे भडगाव तालुक्यातून अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले असून कारवाई सुरू आहे,महसूल विभागाचा कारवाईचा धडाका सुरू राहतो की अवैध वाळू वाहतूक या कडे जनसामान्यांचे लक्ष लागून आहे