Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

पुण्यासह महाराष्ट्रातून हजारो भक्तगण सहभागी जगामध्ये शांती व प्रेम पसरवत जावे-सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

1 0
Read Time14 Minute, 45 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

आध्यात्मिकता व मानवता संगे संगे असा संदेश देणाऱ्या 75व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा समारोप

समालखा(हरियाणा)-नाव्हेंबर, 2022: ‘‘स्वतःला शांती व प्रेमाचे प्रतिरूप बनवून अवघ्या जगामध्ये या दिव्य भावना जगभर पसरवत जावे’’ असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी 75व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समापन सत्रामध्ये देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने सहभागी झालेल्या विशाल मानव परिवाराला संबोधित करताना काढले. या समागमामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भक्तगण आले होते.
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी आपल्या आशीर्वचनाद्वारे प्रेम, शांती व मानवतेचा दिव्य संदेश प्रसारित करणाऱ्या या पाच दिवसीय समागमाची यशस्वी सांगता झाली. भव्य-दिव्य रूपात आयोजित करण्यात आलेल्या 75व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या आयोजनाने समालखा (हरियाणा) येथील संत निरंकारी आध्यात्मिक स्थळाचे प्रांगण श्रद्धा, भक्ति व प्रेमाच्या दिव्य प्रकाशाने आलोकित झाले होते. अध्यात्माच्या या पावन व मनोहारी उत्सवामध्ये सहभागी होऊन भक्तगण आनंदविभोर झाले होते. दिनांक 16 ते 20 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत या संत समागमाचे आयोजन करण्यात आले होते.
पहिला दिवस
सेवादल रॅली
संत निरंकारी मिशनच्या इतिहासामध्ये असे प्रथमच घडले, की समागमातील एक पूर्ण दिवस सेवादलासाठी समर्पित करण्यात आला. या रॅलीमध्ये देश-विदेशातून सहभागी झालेल्या सेवादल महिला व पुरुष स्वयंसेवकांनी शारीरिक कवायती व्यतिरिक्त खेळ, मानवी मनोरे, मल्लखांब यांसारखे कार्यक्रम सादर केले. याशिवाय समागमाचा मुख्य विषय असलेल्या ‘आत्मिकता व मानवता’ या विषयावर लघुनाटिका, व्याख्यान, भक्तिरचना इ. सादर केले.
सद्गुरु माताजींनी सेवादल रॅलीला आपले पावन आशीर्वाद प्रदान करताना सांगितले, की सेवादार भक्त जेव्हा सृष्टीच्या सृजनहाराशी एकरुप होऊन ज्या ज्या जबाबदाऱ्या पार पाडतो त्या सर्व भक्ती बनून जातात.
दुसरा दिवस
समागमाच्या दुसऱ्या दिवशी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि त्यांचे जीवनसाथी निरंकारी राजपिता रमित जी यांचे समागम स्थळावर आगमन होताच समागम समितीच्या सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले आणि एका फुलांनी सुशोभित केलेल्या खुल्या वाहनाद्वारे या दिव्य जोडीला समागमाच्या मुख्य मंचापर्यंत नेण्यात आले. या प्रसंगी उपस्थित भक्तगणांनी त्यांचे भावपूर्ण अभिवादन केले. सद्गुरुंच्या साक्षात दर्शनाने भक्तगणांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू तरळत होते.
मुख्य मंचावर विराजमान झाल्यानंतर सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी मानवतेच्या नावे संदेश दिला. त्यानंतर सायंकाळी सत्संगाच्या मुख्य सत्राला संबोधित करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या की, परमात्म्याच्या प्रति निःस्वार्थ प्रेम हीच खरी भक्ती असून अशीच निरपेक्ष भक्ती संत महात्मा करत असतात. ज्याप्रमाणे एका लहानशा बीजामध्ये मोठा छायादार वृक्ष बनण्याची क्षमता असते त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्य हा परमात्म्याचा अंश असल्याने त्याच्यामध्ये परमात्मस्वरूप होण्याची क्षमता असते. बीज जेव्हा मातीत मिसळून अंकुरित होते आणि पुढे त्याचा वृक्ष बनतो तेव्हा वृक्षाकडून अपेक्षित असलेली सर्व कार्ये तो उत्तमप्रकारे पार पाडत असतो. अशाच प्रकारे ब्रह्मज्ञानाद्वारे मनुष्य जेव्हा परमात्म्याशी तादात्म्य पावतो आणि त्याच्या रंगामध्ये रंगून जातो तेव्हा तो स्वयमेव मानवी गुणांनी युक्त होऊन यथार्थ मनुष्य बनतो. त्यानंतर त्याच्या जीवनात आत्मिकता आणि मानवता यांचा सुरेख संगम पहायला मिळतो.
तिसरा दिवस
समागमाच्या तिसऱ्या दिवशी सत्संगाच्या मुख्य सत्राला संबोधित करताना सद्गुरु माताजींनी मनुष्य जीवनाचे महत्त्व समजावून सांगताना म्हटले, की जीवनातील प्रत्येक क्षण अनमोल आहे. असे अमूल्य जीवन वृथा न दवडता त्याचा सदुपयोग करुन ते लाभदायक बनवावे. कुटुंब आणि समाजाच्या प्रति असलेली कर्तव्ये पार पाडत असतानाच एक पाऊल पुढे टाकून आत्मपरीक्षण करावे आणि आपले जीवन आहे त्यापेक्षा अधिक सुंदर बनवावे. स्वतःचे जीवन सुंदर व सुखमय करत असतानाच इतरांचे जीवन सुखमय करण्यासाठी आपले सकारात्मक योगदान द्यावे. खरे पाहता आध्यात्मिकतेने युक्त जीवन जगण्यासाठी आपण मनुष्य देहामध्ये आलो आहोत. ही बाब प्रमाणित करण्यासाठी ‘आत्मिकता व मानवता संगे संगे’ असलेले समाधानयुक्त सफल जीवन जगावे.
चौथा दिवस
समागमाच्या चौथ्या दिवशी सत्संग समारोहामध्ये उपस्थित विशाल मानव परिवाराला संबोधित करताना सद्गुरु माताजींनी प्रतिपादन केले, की आध्यात्मिकता ही मानवाच्या आंतरिक अवस्थेत परिवर्तन घडवून आणते ज्यायोगे मानवतेला सुंदर रूप प्राप्त होते. मनाच्या अवस्थेवर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले, की मनामध्ये जेव्हा या निराकार प्रभूचा निवास होतो तेव्हा अज्ञानरुपी अंधार नाहीसा होतो आणि मनातील समस्त दुर्भावनांचा अंत होतो.
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांना गांधी ग्लोबल फैमिलीकडून शांतिदूत सन्मान प्रदान
समागमाच्या चौथ्या दिवशी चालू असलेल्या सत्संग समारोहाच्या दरम्यान गांधी ग्लोबल फैमिली मार्फत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांना शांतिदूत सन्मान प्रदान करुन विभूषित करण्यात आले. गांधी ग्लोबल फैमिलीचे अध्यक्ष पद्मभूषण गुलाम नबी आज़ाद यांनी मुख्य मंचावर विराजमान सद्गुरु माताजींना आपल्या करकमलांद्वारे हा सन्मान प्रदान केला. याप्रसंगी सदर संस्थेचे उपाध्यक्ष पद्मश्री डॉ.एस.पी.वर्मा उपस्थित होते.
कवि दरबार
समागमाच्या चौथ्या दिवसाचे मुख्य आकर्षण होते एक बहुभाषी कवी दरबार. या कवी दरबारामध्ये ‘आत्मिकता व मानवता संगे संगे’ या शीर्षकावर आधारित देश विदेशातून आलेल्यास 22 कवींनी हिंदी, पंजाबी, उर्दू, हरियाणवी, मुलतानी, इंग्रजी, मराठी व गुजराती भाषांच्या माध्यमातून सारगर्भित भावनांनी युक्त कविता सादर केल्या.
संत समागमातील अन्य आकर्षणे
निरंकारी प्रदर्शनी
संत समागमामध्ये यावर्षी लावण्यात आलेल्या निरंकारी प्रदर्शनीमध्ये प्रामुख्याने आजवरच्या 75 संत समागमांचा इतिहास मॉडेल्स, तैलचित्रे, प्रत्यक्ष नाटिका तसेच दृकश्राव्य माध्यमातून दर्शविण्यात आला होता. यावर्षी निरंकारी प्रदर्शनीमध्ये 6 मुख्य दालने होती. त्यामध्ये एक मुख्य प्रदर्शनी, स्टुडिओ डिव्हाईन, बाल प्रदर्शनी, आरोग्य आणि समाज कल्याण विभाग प्रदर्शनी, थिएटर आणि डिझाईन स्टुडिओ आदिंचा समावेश होता.
कायरोप्रॅक्टिक शिबिर
निरंकारी संत समागमातील विविध उपक्रमांमध्ये कायरोप्रॅक्टिक शिबिर भक्तगणांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. कायरोप्रॅक्टिक थेरपीमध्ये विशेष करुन मांसपेशी तसेच सांधेदुखीच्या त्रासावर उपचार केले जातात. मागील जवळ जवळ 10 वर्षांपासून निरंकारी संत समागमामध्ये या शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये दररोज शेकडो गरजू उपचार प्राप्त करुन लाभान्वित होत आहेत. सदर शिबिरामध्ये विविध देशांतून जवळजवळ 55 कायरोप्रॅक्टिक विशेषज्ञ आपल्या निष्काम सेवेद्वारे गरजू लोकांवर उपचार करत आहेत. त्यामध्ये कॅनडा, यूएसए, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, चीन, तैवान व स्वित्झरलॅन्ड इत्यादि देशांमधीले विशेषज्ञांचा समावेश आहे.
डॉक्युमेंटरी
निरंकारी संत समागमांचा इतिहास आणि पूर्वीच्या गुरुंनी व संतांनी दिलेल्या महान योगदानांचा सचित्र आढावा घेणारी एक डॉक्युमेंटरी समागमाच्या दरम्यान दृकश्राव्य माध्यमातून तीन भागांमध्ये दाखविण्यात आली ती पाहून उपस्थित भक्तगण समागमांचा दैदिप्यमान इतिहास पाहून अत्यंत प्रभावित झाले.
सेवादल व अन्य भक्तांचे योगदान
सुमारे 600 एकर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या समागमामध्ये मंडळाच्या विविध विभागातील सेवादार भक्त आणि सेवादलाचे सुमारे 1,50,000 महिला व पुरुष स्वयंसेवक रात्रंदिवस आपल्या सेवा अर्पण करत होते.
आरोग्य सेवा
समागमामध्ये आलेल्या भाविकांसाठी समागम स्थळावर 5 अॅलोपॅथिक, 4 होमियोपॅथिक डिस्पेन्सरी आणि 14 प्रथमोपचार केंद्र, एक कायरोप्रॅक्टिक शिबिर तसेच 4 एक्युप्रेशर/फिजिओथेरपी केंद्र तयार करण्यात आले होते. त्याचप्रमाणे मंडळाच्या 12 व हरियाणा सरकारच्या 20 रुग्णवाहिका तैनात होत्या.
सुरक्षा व्यवस्था व वाहतूक व्यवस्था
समागम स्थळावर हरियाणा सरकारच्या सहकार्याने 50 चेक पोस्ट तयार करण्यात आले होते. तसेच मिशनचे हजारो स्वयंसेवक वाहतूक नियंत्रणाचे कार्य पार पाडत होते. समागम स्थळावर येण्यासाठी रेल्वेने दिल्लीतील अनेक रेल्वे स्थानकांवर भक्तगणांसाठी आवश्यक मदत केंद्रे उभारली होती. त्याचप्रमाणे समागम स्थळाजवळ असलेल्या भोडवाल माजरी या रेल्वे स्थानकावर सर्व रेल्वे गाड्या थांबविण्याची व्यवस्था केली होती.
लंगर, कॅन्टीन व पर्यावरण पुरक स्वच्छतेचे उपाय
समागमासाठी आलेल्या सर्व लोकांसाठी समागम स्थळावर चारही मैदानांवर विस्तृत स्वरुपात लंगर (महाप्रसाद) ची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय सवलतीच्या दरात चहा, कॉफी, शीतपेये व अन्य खाद्य पदार्थ उपलब्ध करुन देणारी 22 कॅन्टीनची व्यवस्था केलेली होती. लंगर व कॅन्टीनमध्ये स्टीलच्या थाळ्या व कप ठेवण्यात आले होते ज्यायोगे प्लास्टिकच्या वापराला बगल देण्यात आली होती. याशिवाय मैदानावरील कचऱ्‍याची विल्हेवाट लावण्याचीही उचित व्यवस्था ठेवण्यात आली होती ज्यायोगे वातावरणाची शुद्धता, स्वच्छता व समागम स्थळाची सुंदरता अबाधित ठेवता आली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: Content is protected !!
%d bloggers like this: