अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील प्रमुख व वर्दळीच्या वीर महाराणा प्रताप चौक परिसरात वाढलेल्या अतिक्रमणांवर चाळीसगाव नगरपालिकेने शुक्रवारी सकाळी १० वाजता धडक कारवाई करत रस्ते मोकळे केले. सार्वजनिक रस्ते व चौक परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेली हातगाड्या, तात्पुरती शेड्स, स्टॉल्स तसेच इतर अतिक्रमणे हटवण्यात आली. या कारवाईमुळे काही काळ परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

वीर महाराणा प्रताप चौक येथे धुळे आणि मालेगाव रोड एकत्र येत असल्याने शहरातील अत्यंत वर्दळीचे चौक आहे, येथे वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र काही व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून व्यवसाय मांडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. तसेच पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असल्याने नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही मोहीम राबवली.
कारवाईदरम्यान नगरपालिकेच्या पथकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाड्या, तात्पुरते शेड, टेबल व इतर साहित्य हटवून काही साहित्य जप्तही केले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे अनेक अतिक्रमण धारकांनी आपले साहित्य तत्काळ हटवले.
या मोहिमेत उपमुख्याधिकारी देवेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग प्रमुख दिनेश जाधव, आरोग्य निरीक्षक विजय जाधव, अतिक्रमण मुकादम किरण मोरे, अनिल जाधव तसेच नगरपालिकेचे अनेक कर्मचारी सहभागी झाले होते. कारवाई सुरळीत पार पडावी यासाठी कर्मचाऱ्यांनी परिसरात सतर्कता ठेवली.
नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिक व व्यावसायिकांना सार्वजनिक रस्ते व फूटपाथवर अतिक्रमण न करण्याचे आवाहन केले आहे. शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर अशा प्रकारची कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. नगरपालिकेच्या या कारवाईमुळे चौक परिसरातील रस्ते मोकळे झाल्याने वाहतुकीला काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
अतिक्रमण हटविल्यानंतर व्यावसायिक नाराज…
परिसरात रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून आपला उदर निर्वाह करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांनी या कारवाई वर नाराजी व्यक्त केली असून या मुळे त्यांच्या समोर पुन्हा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली असून नगरपालिका प्रशासनाने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देत रोजगाराचा प्रश्न मिटवावा अशी मागणी केली आहे.
शहरातील अनधिकृत डिजिटल फलकांवर कारवाई कधी?
आज शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमण काढत नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना दिलासा दिला आहे,मात्र शहराचे विद्रुपीकरण करणारे,अपघातांना आमंत्रण असणारे चौका चौकात लागणारे अनधिकृत डिजिटल फलकांवर अशी कारवाई कधी होणार अशी चर्चा शहरात सुरू आहे.
