अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील घाटरोड पोलीस चौकीच्या पाठीमागील गल्लीत किरकोळ वादातून एकमहिण्यापूर्वी झालेल्या मारहाणीच्या घटनेत एका तरुणाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली होती, या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध दिनांक १३ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.४० वाजेच्या सुमारास सोहेल शफी शेख व इतरांसोबत रेहान खान मंजूर खान यांचा वाद झाला. या वादातून मुफीद रेहमान मुजावर व मोहसीन मुजावर यांनी हातातील लाकडी बांबू तसेच लोखंडी रॉडने रेहान खान यांना पाठीवर, पायावर व डोक्यावर मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळील हाडाला फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली.
दरम्यान, झालेल्या वादात पीडिताच्या वडिलांनाही मुफीद रेहमान मुजावर, मुजीब रेहमान मुजावर व सोहेल शफी शेख यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी (१) मुफीद रेहमान मुजावर, (२) मोहसीन मुजावर, (३) मुजीब रेहमान मुजावर व (४) सोहेल शफी शेख, सर्व रा. बाराभाई मोहल्ला, चाळीसगाव यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ११५(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अमित बावीस्कर करीत आहेत.
