अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील सिग्नल चौक परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसची धडक बसून एका तरुणीला गंभीर दुखापत झाल्याची घटना मंगळवारी (दि. 17 मार्च 2026) रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सौ. दिपाली विठ्ठल पाटील (वय 28, रा. भातखंडे ता. भडगाव, जि. जळगाव) या त्यांच्या मोठ्या बहिणी मनिषा बोरसे यांच्यासह चाळीसगाव येथे खरेदीसाठी आल्या होत्या. खरेदी करून परत जात असताना सायंकाळी सुमारे 8.20 वाजेच्या सुमारास सिग्नल चौकातील सुदर्शन बुक डेपो समोर त्या दोघी पायी रस्ता ओलांडत होत्या.
यावेळी मागून येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या हिरव्या रंगाच्या (शिवाई) बस क्रमांक एमएच 49 बीझेड 8269 च्या चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगात वाहन चालवत दिपाली पाटील यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्या रस्त्यावर कोसळल्या असून बसच्या डाव्या बाजूच्या चाकाखाली त्यांचा डावा पाय आल्याने टाच व पंज्यावर गंभीर दुखापत झाली. तसेच उजव्या पायालाही मार लागून सूज आली आहे.
घटनेनंतर त्यांच्या बहिणीने तातडीने त्यांना उपचारासाठी देवरे हॉस्पिटल येथे दाखल केले. तसेच नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर त्यांचे पती पवन रमेश पाटील व इतर नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले.
जखमी दिपाली पाटील यांनी संबंधित एस.टी. बस चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्याबाबत कायदेशीर तक्रार दिली असून शहर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
