अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरात रात्रीच्या वेळी एका महिलेच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून गळ्यातील सोन्याची पोत लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात मोटारसायकलस्वाराविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्राजक्ता प्रतीक राखुंडे (वय २६, रा. राखुंडे नगर, मालेगाव रोड, चाळीसगाव) या १३ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घरातील खरकटे पाणी फेकण्यासाठी घराबाहेर गेल्या होत्या. त्यावेळी मोटारसायकलवर आलेल्या एका अज्ञात इसमाने त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यामुळे त्या काही क्षण गोंधळून गेल्या असताना त्या इसमाने त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेनंतर महिलेने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक व त्यांच्या घरातील सदस्य बाहेर आले. मात्र तोपर्यंत आरोपी मोटारसायकलवरून पसार झाला होता.
या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करत आहेत.
