अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील हनुमानवाडी परिसरात रविवारी (दि. १५ मार्च २०२६) रात्री गोळीबाराची घटना घडली असून या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत सिकंदर शेख निसार शेख (वय ३६, रा. अनिल नगर, रेल्वे स्टेशनजवळ, चाळीसगाव) हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ मार्च रोजी रात्री सुमारे ८.३० वाजेच्या सुमारास हनुमानवाडी परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी अंकित महेंद्र मोरे, मेहुल रत्नपाल मोरे, कृष्णा जिभाऊ झाल्टे (सर्व रा. चाळीसगाव) तसेच इतर दोन अनोळखी इसम हे दोन गावठी कट्टे दाखवत होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने हातातील गावठी कट्टा फिर्यादीच्या दिशेने रोखून ट्रिगर दाबल्याने जोराचा आवाज झाला आणि सुटलेली गोळी सिकंदर शेख यांच्या उजव्या खांद्यामध्ये लागली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला.
या प्रकरणी जखमी सिकंदर शेख याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपींच्या शोधासाठी चाळीसगाव शहर पोलिसांनी दोन विशेष पथके रवाना केली असून या घटनेमागील नेमके कारण काय याचा सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार (चाळीसगाव परिमंडळ) तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी व त्यांचे सहकारी या गुन्ह्याचा बारकाईने तपास करत आहेत.
