अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील धामणगाव येथे सोमवारी घडलेल्या एका थरारक आणि हृदयस्पर्शी घटनेत मादी बिबट व तिच्या बछड्याची यशस्वी पुनर्भेट घडवून आणण्यात वनविभागाला मोठे यश आले आहे.
धामणगाव येथील शेतकरी दशरथ नथ्थू पाटील हे सोमवारी दुपारी सुमारे १२ वाजता शेतात पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना शेतात बिबटाचा एक बछडा आढळून आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली.
माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बछड्याला सुरक्षित ताब्यात घेतले व त्याला कॅरेटमध्ये ठेवण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आल्यानंतर बछड्याची त्याच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वनपरीक्षेत्र अधिकारी कोमल पिंडकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सागर पाटील, वनरक्षक अजय महिरे, ललित पाटील तसेच वनमजूर बाळू शितोळे, श्रीराम राजपूत, संजय गायकवाड, भाईदास राठोड, धीरज पाटील आणि चालक राहुल पावर यांच्या पथकाने यासाठी विशेष नियोजन केले.
बछड्याला ठेवलेल्या ठिकाणी कॅरेटभोवती पालापाचोळा रचून जंगलासारखे नैसर्गिक वातावरण तयार करण्यात आले. परिसर पूर्णपणे शांत ठेवण्यात आला, जेणेकरून मादी बिबट सुरक्षित वाटून बछड्याजवळ येईल. त्या ठिकाणी चार ट्रॅप कॅमेरे तसेच एक लाईव्ह कॅमेरा बसवण्यात आला.
संपूर्ण दुपार कर्मचारी दूर अंतरावरून लक्ष ठेवून होते. अखेर सायंकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास मादी बिबट आपल्या पिल्लाच्या ओढीने त्या ठिकाणी आली आणि बछड्याला सुरक्षितपणे घेऊन गेली. हा दुर्मिळ आणि आनंददायी क्षण ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला.
वनविभागाच्या सतर्कता, संयम आणि योग्य नियोजनामुळे ही पुनर्भेट यशस्वी झाली असून या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, मादी बिबट आपल्या बछड्यासह परिसरातच वावरत असल्याची शक्यता असल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
