Oplus_16908288
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी)-सोशल मीडियावर दिशाभूल करणारी पोस्ट टाकून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर प्रकार चाळीसगावात समोर आला आहे. याप्रकरणी नगरसेवक रामचंद्र यशवंत जाधव (वय ५३) यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास जाधव आपल्या कुटुंबासह घरी असताना त्यांचे मित्र निलेश प्रभाकर पिंगळे यांनी फोन करून “हक्क मागतोय चाळीसगांव” या फेसबुक पेजवर एक फोटो व आक्षेपार्ह मजकूर व्हायरल झाल्याची माहिती दिली. संबंधित पोस्टमध्ये जाधव व आमदार मंगेश दादा चव्हाण एकत्र जेवण करतानाचा फोटो शेअर करून “हा जेवणातील भेदाभेद का? अजून भेदाभेद संपला नाही वाटतंय?” असा भडकावू मजकूर लिहिण्यात आला होता.
जाधव यांनी स्वतः फेसबुक उघडून पाहणी केली असता ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचा जातीय भेदभाव घडलेला नसताना आमचा एकोपा असताना जाणीवपूर्वक खोटा व दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित करण्यात आला. यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच,या प्रकारामुळे स्वतःला व कुटुंबीयांना मानसिक व भावनिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही जाधव यांनी सांगितले. “हक्क मागतोय चाळीसगांव” हे फेसबुक पेज चालविणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 196(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.
