अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-: शहरातील जैन मंदिरासमोर असलेल्या मंडप साहित्याच्या गोडाऊनला दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या गोडाऊनमध्ये माजी नगरसेवक बाळू खत्ती यांचे मंडपाचे साहित्य ठेवण्यात आले होते. आगीमुळे परिसरात काही काळ घबराट पसरली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या गोडाऊनला आग लागली ते ठिकाण पूर्वी भारत गॅस कंपनीचे गॅस सिलिंडर ठेवण्यासाठी वापरले जात होते. सध्या मात्र त्या ठिकाणी मंडपाचे विविध साहित्य साठवून ठेवलेले होते. दुपारी अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते बंटी शर्मा यांच्या घरासमोरच हे गोडाऊन असल्याने त्यांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवत जीव धोक्यात घालून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घरातील बोरिंग सुरू करून नळीच्या सहाय्याने पाणी मारत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
मात्र आग वाढत असल्याचे लक्षात येताच तेथे उपस्थित असलेले पत्रकार सूर्यकांत कदम यांनी अग्निशमन दलाला तातडीने माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.
या आगीत मंडप साहित्याचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागण्याचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
