अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
रावेर(प्रतिनिधी)-रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने गुप्त माहितीच्या आधारे रसलपूर गावातील कुरेशी मोहल्ल्यात छापा टाकत गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली. या कारवाईत एकूण सुमारे १७५ किलो गोमांस व धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलिसांना गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रसलपूर येथील कुरेशी मोहल्ल्यात गोवंशाची कत्तल करून गोमांसाची विक्री केली जात आहे. या माहितीनुसार दि. १० मार्च २०२६ रोजी सकाळी गुन्हे शोध पथकाने तेथे छापा टाकला. यावेळी शेख युसुफ शेख अय्युब कुरेशी (वय ५०) व शेख सानिफ शेख युसुफ कुरेशी (वय २५) हे पिता-पुत्र गोवंशाचे मांस कापून विक्री करताना आढळले. पोलिसांना पाहताच दोघांनी गल्लीबोळाचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना पाठलाग करून ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून १३० किलो गोवंश मांस (अंदाजे किंमत २६ हजार रुपये) व धारदार कोयता जप्त करण्यात आला.
दरम्यान, त्याच परिसरात दुसऱ्या ठिकाणी छापा टाकला असता शेख नईम शेख अय्युब कुरेशी हा पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशाची कत्तल करताना दिसून आला. मात्र पोलिस पथक पोहोचण्यापूर्वीच तो गल्लीबोळातून पसार झाला. घटनास्थळावरून २५ किलो मांस (किंमत अंदाजे ५ हजार रुपये) व धारदार कोयता जप्त करण्यात आला.
या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनमध्ये पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत चव्हाण यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून गु.र.नं. ९६/२०२६ अंतर्गत महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारित) अधिनियम २०१५ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. तसेच या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याबाबत सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कारवाईदरम्यान एकूण ३१ हजार रुपये किमतीचे अंदाजे १७५ किलो गोमांस व सुरे जप्त करण्यात आले. जप्त मांसाचे नमुने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रंजीत पाटील (रावेर) यांच्या उपस्थितीत घेऊन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर (फैजपूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पो.उपनिरीक्षक मनोज महाजन तसेच प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, गजानन बोने, राहुल परदेशी व शुभम काळे यांचा सहभाग होता.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सिकंदर तडवी करीत आहेत.
