अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
नवी दिल्ली :रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘गुड समॅरिटन’ (मदतनीस) योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने रुग्णालयात पोहोचवणाऱ्या मदतनीसाला आता २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. यापूर्वी ही रक्कम केवळ ५ हजार रुपये होती. त्यामुळे या बक्षिसात पाच पटीने वाढ करण्यात आली आहे.
अपघातानंतरच्या अत्यंत महत्त्वाच्या ‘गोल्डन अवर’मध्ये जखमींना रुग्णालयात दाखल करणाऱ्या व्यक्तीला २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असून, त्यासोबत प्रशस्तीपत्रही प्रदान करण्यात येईल. तसेच अशा मदतनीसांचा ‘राह-वीर’ या सन्मानाने गौरव केला जाणार आहे.
या योजनेअंतर्गत अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पहिल्या ७ दिवसांसाठी १.५ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस (मोफत) उपचार सरकारकडून करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे ही योजना केवळ राष्ट्रीय महामार्गांपुरती मर्यादित न राहता, राज्य महामार्ग, जिल्हा रस्ते तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांवरील अपघातांनाही लागू असणार आहे.
राज्यसभेत माहिती देताना मंत्री गडकरी यांनी सांगितले की, सरकार अशा मॉडेलवर काम करत आहे, ज्या अंतर्गत अपघातस्थळी अवघ्या १० मिनिटांत आधुनिक सुविधांनी सज्ज रुग्णवाहिका पोहोचवली जाईल. यासाठी विविध राज्यांशी करार करण्यात येत असून, तांत्रिकदृष्ट्या प्रगत हेल्पलाईन सिस्टीम उभारण्याचे काम सुरू आहे.
कायदेशीर कटकटीतून सुटका
अपघातातील जखमींना मदत केल्यानंतर पोलीस चौकशी किंवा न्यायालयीन प्रक्रियेच्या भीतीने अनेक नागरिक मदत करण्यास पुढे येत नाहीत. मात्र, ‘गुड समॅरिटन’ कायद्यानुसार मदत करणाऱ्या व्यक्तीची सक्तीने चौकशी केली जाणार नाही, तसेच त्यांना साक्षीसाठी अडकवले जाणार नाही, असेही केंद्र सरकारकडून पुन्हा स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे अपघातग्रस्तांना वेळेत वैद्यकीय मदत मिळण्यास मोठी चालना मिळणार असून, अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
