Oplus_16908288
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया, भडगाव रोड येथील एटीएममध्ये एका व्यक्तीची हातचलाखी करून एटीएम कार्ड बदलत ४० हजार रुपये काढून फसवणूक केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांनी बिहारमधील आरोपीला कोपरगाव तालुक्यातून अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास विकास भावलाल राठोड (वय ४०, रा. चैतन्य तांडा, करगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) हे एसबीआयच्या भडगाव रोडवरील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका अनोळखी इसमाने एटीएम मधून पैसे काढून देतो म्हणत त्यांचे एटीएम कार्ड घेतले व त्यांच्या हातात हातचालकी करत दुसरे कार्ड दिले. त्यानंतर संबंधित इसमाने राठोड यांच्या खात्यातून ४० हजार रुपये काढून घेतले.
या प्रकरणी राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक १४५/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ११८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सोनुकुमार पंचानंद सनगही (वय ३२, रा. भमरपूर, बनेसार चौक, बिहार) हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, आरोपी कोपरगाव तालुक्यातील पडेगाव येथे असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अरुण बाविस्कर, पोहेकॉ किशोर पाटील व पोकॉ नंदकिशोर महाजन यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला चाळीसगाव येथे आणून गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ किशोर पाटील हे करत आहेत.
एटीएम मधून पैसे काढण्यासाठी काही अडचण आल्यास आवश्यक असल्यास सिक्युरिटी गार्डची मदत घ्यावी,कोणत्याही अनोळखी व्यक्तीची मदत टाळावी.तसेच आपल्या एटीएम कार्डचा नंबर, सी वी वी नंबर, पिन कोणाला सांगू नये – चाळीसगाव शहर पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ
