अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी जागा उपलब्ध करून देणे तसेच इमारतीसाठी निधी मंजूर करण्यात मोलाची भूमिका बजावल्याबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांचा चाळीसगाव वकील संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास वकील संघाचे पदाधिकारी, जेष्ठ विधिज्ञ तसेच सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान जेष्ठ विधिज्ञ साहेबराव पाटील तसेच वकील संघाचे अध्यक्ष ॲड. धीरज पवार यांनी मनोगत व्यक्त करत ना. गिरीष महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांचे आभार मानले. चाळीसगावच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मागणीला अखेर यश मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी वकील संघाच्या वतीने चाळीसगाव येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याची मागणी देखील करण्यात आली. ही मागणी रास्त असल्याचे मान्य करत ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन ना. गिरीष महाजन यांनी दिले. तसेच अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजन लवकरच करण्यात येणार असून पुढील दोन वर्षांत भव्य इमारत उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांनी न्यायालयासाठी जागा उपलब्ध करून घेणे व निधी मंजुरीपर्यंतचा संपूर्ण प्रवास सविस्तर मांडला. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच या प्रकल्पास मंजुरी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ॲड. रणजीत पाटील यांनी केले. वकील संघाची तब्बल ४२ वर्षांची मागणी पूर्णत्वास आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
माजी खासदार उन्मेष पाटील यांनी बिलाखेड शिवारातील न्यायालयाच्या जागेबाबत केलेल्या बेकायदेशीरतेच्या आरोपांवर वकील संघाने तीव्र आक्षेप नोंदवला. अशा वक्तव्यांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे सांगत, न्यायालयासारख्या विकासात्मक प्रकल्पात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा निषेध वकील संघाने व्यक्त केला.
