अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-: गिरणा मोठा प्रकल्प वेगाने भरत असून आज (दि. 31 जुलै 2026) दुपारी 12 वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा 97.06 टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मा. कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांच्या आदेशान्वये आज दुपारी 1 वाजता गिरणा धरणाचे द्वार परिचलन करून गिरणा नदीपात्रात प्रारंभी 1000 ते 2000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
सध्या गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून अंदाजे 10 हजार ते 15 हजार क्युसेक्स इतकी पाण्याची आवक धरणात होत आहे. येत्या काही तासांत पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि धरणातील आवक वाढल्यास नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ केली जाऊ शकते, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
या पार्श्वभूमीवर गिरणा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीकिनारी असलेले पशुधन, शेतीसाठी वापरण्यात येणारे मोटार पंप, कृषी साहित्य तसेच इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुरेढोरे व इतर जनावरे नदीकाठापासून दूर सुरक्षित स्थळी ठेवावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय नदीपात्रात विविध विभागांची सुरू असलेली बांधकामे, यंत्रसामग्री, साहित्य व इतर वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ही माहिती उपविभागीय अभियंता विजय प्र. जाधव, पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
