oplus_2097154
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी)- रेल्वे पलीकडील परिसरातील नागरिकांसाठी शहरात ये जा करण्यासाठी महत्त्वाची असलेली करगाव रेल्वे मोरी दि. २६ जुलैपासून रेल्वे विभागाच्या विकासकामासाठी तात्पुरती वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. हे काम अंदाजे १५ दिवस सुरू राहणार असून काम पूर्ण होताच रेल्वे मोरी पुन्हा नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत परिसरातील नागरिकांनी रेल्वे पुलाच्या मार्गाचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वे विभागाकडून करगाव रेल्वे मोरीच्या कामाला सुरुवात झाली असून भविष्यात सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी हे काम करण्यात येत असून रेल्वेची कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांची दळणवळणाची सुविधा अधिक सुरक्षित व सुलभ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.रेल्वे मोरी बंद असल्यामुळे रेल्वे पलीकडील परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार तसेच व्यापाऱ्यांना काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे. मात्र ही गैरसोय तात्पुरती असून विकासकामाच्या दृष्टीने नागरिकांनी संयम ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासंदर्भात वॉर्ड क्रमांक १ चे नगरसेवक करण सूर्यवंशी यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, रेल्वेची विकासकामे पूर्ण होईपर्यंत सर्व नागरिकांनी रेल्वे पुलाचा वापर करावा तसेच करगाव मोरी कडून प्रवास टाळावा रेल्वे विभाग तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व अडथळा निर्माण होणार नाही याची देखील काळजी घ्यावी.रेल्वे विभागाकडून काम शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून, अंदाजे १५ दिवसांनंतर मोरी पुन्हा वाहतुकीसाठी खुली होण्याची अपेक्षा आहे. काम पूर्ण झाल्यानंतर करगाव मोरी परिसरातील नागरिकांची दैनंदिन वाहतूक अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि सुरळीत होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
