Oplus_16908288
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान चाळीसगाव शहर पोलिसांनी तत्परता दाखवत एका बेशुद्ध अवस्थेतील अनोळखी व्यक्तीचे प्राण वाचवून पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
काल दिनांक ३१ जुलै रोजी सकाळी अंदाजे 10.50 वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील बीट मार्शल क्रमांक 02 व डायल 112 वर कर्तव्य बजावत असलेले पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र चौधरी व पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण महाजन यांना डायल 112 वर माहिती प्राप्त झाली की, एक अनोळखी इसम रेल्वे स्टेशनकडून अनिलनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेला असून त्याच्या तोंडातून फेस येत आहे.
माहिती मिळताच संबंधित पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सुरू असलेल्या मुसळधार पावसाची पर्वा न करता त्यांनी सदर व्यक्तीला त्वरित उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव येथे दाखल केले. योग्य वेळी वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले.
त्यानंतर बीट पोलीस हवालदार दत्तात्रय महाजन यांच्या मदतीने संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न करण्यात आले. चौकशीअंती त्या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. सदर इसमास त्याची आई विमल पंडित बोरकर (रा. पाचोरा) व भाचा यश पाटील यांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले.
या संपूर्ण घटनेत चाळीसगाव शहर पोलिसांनी दाखविलेली तत्परता, संवेदनशीलता आणि कर्तव्यदक्षता याचे सर्वत्र कौतुक होत असून पोलिसांनी पुन्हा एकदा समाजासमोर माणुसकीचा आदर्श ठेवला आहे.
सदर कामगिरी पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
