oplus_136314882
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील पंचशील नगर परिसरात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील चार जणांसह पाच जण जखमी झाल्याची घटना दिनांक ७ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमार घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव पुन्हा एकदा समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अडीच वर्षीय ईशान्वी चेतन रणधीर हिला भटक्या कुत्र्याने चावा घेतला. मुलीला कुत्र्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी धाव घेतलेल्या तिचे आजोबा राहुल रणधीर (वय ५६), वडील चेतन रणधीर (वय २६) आणि काका केतन रणधीर (वय २६) यांनाही कुत्र्याने चावा घेतला.या घटनेच्या काही वेळेपूर्वी याच परिसरातील गौतम सूर्यवंशी (वय २०) या तरुणालाही त्याच कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती आहे.

सर्व जखमींवर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र ईशान्वी रणधीर आणि राहुल रणधीर यांना गंभीर स्वरूपाचे चावे लागल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले.
चाळीसगाव शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पंचशील नगर परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
चाळीसगाव शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीय वाढली असून अनेक भागांत कुत्र्यांचे घोळके मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार घडणाऱ्या चाव्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.यापूर्वी देखील कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना झाल्या मात्र त्याचा प्रभाव काही पाहायला मिळाला नाही कारण भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होण्या एवेजी वाढतांना दिसत आहे.
