अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव(प्रतिनिधी)-: जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व चोपडा शहर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने बेकायदेशीर शस्त्रास्त्रांची वाहतूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीवर धडक कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एक गावठी कट्टा (पिस्तूल), दोन मॅगझिन, तीन मोबाईल फोन आणि एक कार असा एकूण सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला १ जुलै २०२६ रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, काही संशयित इसम एका कारमधून विनापरवाना गावठी कट्टा घेऊन लासूर–चुंचाळे मार्गे चोपडा शहराकडे येत आहेत. या माहितीची खात्री करून स्थानिक गुन्हे शाखा व चोपडा शहर पोलीस यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले.
पथकाने चोपडा–लासूर–चुंचाळे रोडवरील शनिमंदिर परिसरात सापळा रचला. सायंकाळी सुमारे ७.३० वाजता संशयित Hyundai EON (MH-20 EE-6103) कार अडवून पंचांसमक्ष झडती घेतली असता, कारच्या मागील सीटखाली एक गावठी कट्टा, त्यासह एक मॅगझिन आणि एक अतिरिक्त मॅगझिन आढळून आले. तसेच आरोपींकडून ओप्पो, विवो आणि रेडमी कंपनीचे तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ज्ञानेश्वर रामकृष्ण माळी (वय ३९, रा. कुऱ्हाड खुर्द, ता. पाचोरा, जि. जळगाव), सचिन रोशन पवार (वय ३४, रा. मयूर पार्क कॉलनी, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि अनिल कचरे साळुंखे (वय ३७, रा. जाधव गल्ली, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.कारवाईदरम्यान ६० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, १० हजार रुपयांचे अतिरिक्त मॅगझिन, ५ लाख रुपयांची Hyundai EON कार आणि ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८५/२०२६ भारतीय हत्यार कायदा (Arms Act) कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चोपडा शहर पोलीस करीत आहेत.ही उल्लेखनीय कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
