अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक, शैक्षणिक व लोककल्याणकारी कार्याचा गौरव व्हावा तसेच भावी पिढीला त्यांच्या विचारांची प्रेरणा मिळावी, यासाठी चाळीसगाव शहरात त्यांचे भव्य-दिव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रतिभा चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
दिनांक १६ जून २०२६ रोजी देण्यात आलेल्या निवेदनात छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानचे लोकप्रिय राजे व महान समाजसुधारक होते. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षणाचा प्रसार, सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केलेले कार्य, मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची अंमलबजावणी, मोफत व सक्तीचे शिक्षण, वसतिगृहांची स्थापना, दलितांना समान हक्क मिळवून देणे, अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ तसेच शेतकरी व औद्योगिक विकासासाठी त्यांनी केलेले ऐतिहासिक योगदानाबद्दल आठवणींना उजाळा देत या महान कार्याची आठवण कायम राहावी आणि सर्व समाजघटकांना प्रेरणा मिळावी, यासाठी चाळीसगाव शहरात छत्रपती शाहू महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारण्याची मागणी सर्व जाती-धर्मातील नागरिकांकडून होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, शहराध्यक्ष कैलास पाटील, माजी शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील, युवक तालुका उपाध्यक्ष रोहित बोरसे, तालुका संघटक रोहिदास सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील, तसेच युवराज शिंदे, सुधीर पाटील, विलास पाटील, अरविंद पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
