अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख(मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
पाचोरा(प्रतिनिधी)-शहरात दिवसा ढवळ्या घरात घुसून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना पाचोरा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अटक केली असून, गुन्ह्याची यशस्वी उलगडा करत पोलिसांनी चोरीस गेलेली रोकड व गुन्ह्यात वापरण्यात आलेले बनावट पिस्तूलही जप्त केले आहे.
१२ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.१५ वाजता फिर्यादी सौ. कुसुम एकनाथ मोकळे (रा. लक्ष्मी आंगन कॉलनी, पाचोरा) यांच्या घरी आरोपींनी “ॲमेझॉनचे पार्सल आले आहे” असा बहाणा करून घरात प्रवेश केला. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत फिर्यादी व त्यांच्या मुलांना एका ठिकाणी बसवून घरातील कपाटातील ७ हजार रुपये रोख तसेच मुलाच्या गल्ल्यातील ७०० रुपये असा एकूण ७,७०० रुपयांचा ऐवज लंपास करून आरोपी पसार झाले.
या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य आरोपी चेतन उर्फ जितू प्रभाकर भुतेकर याला अटक केली. पुढील तपासात गोकुळ महादू वाघ (पाटील) आणि योगेश परशराम शिंदे यांचा सहभाग उघड झाला. आरोपींकडून चोरीची रक्कम व गुन्ह्यात वापरलेले खेळण्यातील बनावट पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
तपासात फिर्यादीच्या घरात सोन्याच्या चिपा असल्याच्या माहितीवरून हा कट रचण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, या गुन्ह्यात इतर काही संशयितांचाही सहभाग असल्याचा तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वापूसाहेब रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, सहाय्यक फौजदार विलास पाटील, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, हरीश परदेशी, गणेश कुंवर, श्रीराम शिंपी आणि नितीन भालेराव यांनी सक्रिय सहभाग घेतला.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करीत आहेत.
