अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी): चाळीसगाव शहरातील बसस्थानक परिसरात दुकान लावण्याच्या जुन्या वादातून २७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.फिर्यादीवरून या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय भानुदास पाटील (वय २७, रा. लक्ष्मीनगर, चाळीसगाव) हा आपल्या वडिलांसोबत मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याचे आणि एका परिसरातील तरुणाचे बसस्थानक परिसरात दुकान लावण्याच्या कारणावरून वारंवार वाद होत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
१८ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास वाद सुरू असलेल्या तरुणाने बोलावल्याचे सांगून अक्षय घराबाहेर गेला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे पोलिसांनी कुटुंबीयांना अक्षयला मारहाण झाल्याची माहिती दिल्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आल्याचे समजले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
यानंतर पोलिसांसमवेत घटनास्थळी गेलेल्या कुटुंबीयांना बसस्थानक मागील परिसरात एका पडीक घरासमोर रक्ताचे थारोळे तसेच रक्ताने माखलेले विटांचे तुकडे आढळून आले. यावरून अक्षयची विटांनी डोक्यावर व तोंडावर वार करून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मृताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चाळीसगाव शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
