अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत (मिड डे मिल) शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासाठी आवश्यक तांदूळ व धान्यादी मालाचा तातडीने पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत माहिती देताना गौतम कांबळे यांनी सांगितले की, १५ जून २०२६ पासून नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू झाले असले तरी अनेक शाळांना अद्याप तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा करण्यात आलेला नाही. परिणामी शाळा प्रशासनाला वारंवार उसनवारी किंवा लोकवर्गणीतून तांदूळ उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची व्यवस्था करावी लागत आहे.
मात्र आता अशा प्रकारे धान्याची उपलब्धता करून देणे शाळा स्तरावर अशक्य होत चालले असून अनेक शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत दिला जाणारा पोषण आहार बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहू नयेत यासाठी तातडीने तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा करण्याची मागणी महासंघाने केली आहे.
या निवेदनाच्या प्रती दौंडचे आमदार राहुल कुल, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव तसेच प्राथमिक शिक्षण संचालक यांनाही देण्यात आल्या आहेत.
यावेळी राज्य महासचिव विठ्ठल सावंत, राज्य प्रवक्ते विनोद चव्हाण, राज्य सल्लागार दशरथ गावडे, जिल्हा महिला आघाडी सचिव सुषमा तरटे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
