अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-मेहुणबारे पोलिसांनी अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या दोन संशयितांना अटक करत त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व तलवार जप्त केली आहे. ही कारवाई ३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी मेहुणबारे गावाजवळील जामदा पुलावर करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीदरम्यान संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळी चालक संतोषसिंग जसवंतसिंग जसबीरसिंग (वय २६) व क्लिनर जसबीरसिंग जसवंतसिंग (वय २६, रा. आलोक खलन, ता. बटाला, जि. गुरुदासपूर, पंजाब) यांच्याकडून शासनाने प्रतिबंधित केलेले शस्त्र आढळून आले.
तपासणीत आरोपींकडून सुमारे ₹२५ हजार किमतीचे एक गावठी पिस्तूल तसेच ₹१,२०० किमतीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ₹२६,२०० असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू असून, त्यांनी ही शस्त्रे कुठून आणली आणि त्यांचा वापर कोणत्या उद्देशाने होणार होता, याचा शोध पोलिस घेत आहेत.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास दादाजी शिरोळे करीत आहेत. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे तसेच मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
मेहुणबारे पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे मेहुणबारे पोलिसांनी सांगितले.
