अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
49 हजारांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत; आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देशमुख वाडा, जुनी नगरपालिका परिसरात झालेल्या घरफोडीचा छडा लावत शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला अटक करून 49 हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
देशमुख वाडा, जुनी नगरपालिका, चाळीसगाव येथे राहणाऱ्या मनिषा रामराव सूर्यवंशी यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत सोन्याचे नाणे (गोळी), चांदीच्या साखळ्या आणि रोख रक्कम असा एकूण 49 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला होता. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 410/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305(अ), 331(3) व 331(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पोहेकॉ योगेश बेलदार, पोहेकॉ नितीन आगोणे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील, अशोक मोरे आणि दत्तू सावळे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे जुनी नगरपालिका परिसरात सापळा रचून संशयित निलेश मनोज सोनार (वय 25, रा. देशमुख वाडा, जुनी नगरपालिका, चाळीसगाव) याला ताब्यात घेतले.
पोलीसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपीने घरफोडीची कबुली दिली. त्याच्याकडून 2.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे (गोळी), 15 भारांच्या चांदीच्या साखळ्या आणि 9 हजार रुपये रोख, असा एकूण 49 हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ नितीन आगोणे हे करीत आहेत. चाळीसगाव शहर पोलिसांच्या या जलद कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.